दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे/कोल्हापूर, सांगली

गेले चार दिवस दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांना महापुराने घातलेला विळखा शुक्रवारी काहीसा सैल झाला. पुराचे पाणी ओसरू लागले असले तरी समस्यांचा विळखा मात्र आणखी घट्ट झाला आहे. मदतकार्याला वेग आला असला तरी अपुरी यंत्रणा, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, पुनर्वसनाचे प्रश्न बिकट झाले आहेत.

कृष्णा-वारणेमुळे सांगली आणि पंचगंगेमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात गेल्या सोमवारपासून भीषण पूरस्थिती आहे. पश्चिम घाटात पडणारा मुसळधार पाऊस आणि अलमट्टीतून कमी होत असलेला विसर्ग यामुळे या तिन्हीही नद्यांच्या पुराने सांगली आणि कोल्हापूरला आपल्या विळख्यात घेतले होते. या पुराच्या स्थितीत गुरुवापर्यंत भीषण वाढ होत हा सगळा प्रदेशच जलमय झाला होता. गुरुवारी सायंकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने तसेच अलमट्टीच्या विसर्गामध्ये साडेचार लाख क्युसेकपर्यंत वाढ केल्याने शुक्रवारी सकाळपासूनच या दोन्ही शहरांना बसलेला पुराचा विळखा काही प्रमाणात सुटण्यास सुरुवात झाली. कोल्हापुरात पंचगंगेची धोका पातळी ४३ फूट असून ती गुरुवारी ५८ फुटापर्यंत उंचावली होती. त्यामध्ये घट होत शुक्रवारी ती ५२ फुटांवर आली. तर सांगलीत गेल्या २० तासांहून अधिक काळ ५७ फूट ५ इंचावर असलेली कृष्णेची पातळी शुक्रवारी केवळ ३ इंचाने घटली. जिल्ह्य़ात अन्यत्र मात्र पूरपातळी झपाटय़ाने कमी होत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.

या दोन्हीही जिल्ह्य़ांत शुक्रवारी मदतकार्याला वेग आला. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, नौदल, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय पथके आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने हे मदतकार्य सुरू होते. गेल्या चार दिवसांत दोन्ही जिल्ह्य़ांत मिळून तब्बल तीन लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले आहे. यासाठी विविध पथकांच्या तब्बल १०० हून अधिक बोटींचा वापर केला जात आहे. परंतु, तरीही अद्याप या दोन्ही जिल्ह्य़ांत हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. या मदतकार्याला आता वेग आला असला तरी पुराची व्याप्ती पाहता ही यंत्रणा आणि मदत अपुरी पडत आहे. विशेषत: सांगली-कोल्हापूरच्या ग्रामीण भागात मदत पोहोचवण्यात मर्यादा येत आहेत. यामुळे लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत घेत या भागातील अडकलेल्या नागरिकांसाठी अन्नाची पाकिटे पुरविण्यात आली.

शासनाच्यावतीने तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दोन्ही शहरांत वैद्यकीय उपचारांची शिबिरे सुरू करण्यात आलेली आहेत. मात्र एकूण संख्येच्या तुलनेत ही मदत तोकडी आहे. गेले चार दिवस या दोन्ही जिल्ह्य़ातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित आहे. संपर्काची साधने बंद आहेत. अनेक रस्त्यांवर पाणी असल्याने वाहतूक बंद आहे. या सर्व समस्यांमुळे  पुरात अडकलेले, स्थलांतरित झालेले नागरिक हैराण झाले आहेत.

दरम्यान, सांगली जिल्ह्य़ातील ब्रह्मनाळ येथे मदतबोट उलटून झालेल्या अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतील बेपत्ता व्यक्तींचा शोध मात्र शुक्रवारीही लागलेला नव्हता. पुणे-बेंगळुरू महामार्गावर गुरुवारी सहा फुटांपर्यंत असलेले पाणी  शुक्रवारी तीन फुटांपर्यंत ओसरले. मात्र, या पाण्यामुळे सलग चौथ्या दिवशीही महामार्ग वाहतुकीसाठी बंद होता. हा महामार्ग बंद असल्यामुळे दोन्ही बाजूकडे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या आहेत.

पाणी, इंधनांसाठी रांगा  कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही शहरांत पेयजल मिळणाऱ्या केंद्रांवर रांगा लागलेल्या आहेत. पेट्रोल-डिझेलही कमी प्रमाणात उपलब्ध आहे. पेट्रोल पंपांवरही मोठय़ा रांगा लागल्या आहेत. प्रशासनाने बचाव कार्यासाठी इंधन राखून ठेवले आहे.

*दोन्ही शहरांतील पाणीपुरवठा यंत्रणा गेले पाच दिवस बंद आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक हैराण झाले आहेत.

*पुरानंतर या शहरांत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. अनेक आजारी व्यक्तींना वैद्यकीय मदत मिळण्यातही अडचण येत आहे. दवाखाने, रुग्णालयेदेखील पाण्यात असल्याने या मदतीलाही मर्यादा पडत आहेत.

* पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर आता अनेक समस्यांचा पूर आला आहे. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, पुनर्वसनाचा बिकट प्रश्न, मदतीच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.