कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील महापुरात तसेच दरडी कोसळल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. पुरामुळे विस्थापित झालेल्यांची संख्याही मोठी असून मृतांचे तत्काळ शवविच्छेदन करून देण्यापासून ते जखमींवरील उपचार, तसेच साथरोग पसरू नये यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा वेगाने काम सुरु केले आहे. तत्काळ मदतीसाठी आरोग्य विभागाने ‘रोड मॅप’ तयार केला असून पूरग्रस्त गावात तसेच नागरिकांना ज्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, तेथे पोहोचून आरोग्य विभागाचे डॉक्टर व कर्मचारी लष्कराच्या धडक कारवाईसारखे मदत कार्य करत आहेत.

रायगड, रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात महापुराने जनजीवनाची पुरती वाताहात केली आहे. महाडजवळ तळीये हे अख्खे गाव दरडीखाली गाडले गेले. या महापुरातून लोकांना वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, लष्कर, नौदल तसेच कोस्ट गार्डची अनेक पथके दिवसरात्र काम करत आहेत. या सर्वांबरोबर आरोग्य विभागाची यंत्रणाही अत्यंत शिस्तबद्ध काम करत आहे. जवळपास ११३ हून अधिक व्यक्ती महापूर व दरडी कोसळल्याने मृत्यू पावल्या असून, या घटना जेथे घडल्या तेथेच लगेचच शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात देण्याचे काम आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

घरोघरी जाऊन जुलाब, उलटी, ताप याबाबत सर्वेक्षण होणार –

जखमींमध्ये अस्थिभंगाचे प्रमाण लक्षात घेऊन संबंधित भागात तत्काळ अस्थिशल्य चिकित्सकांची पथके पाठविण्यात आली आहेत. पूरग्रस्त भागात पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत झाली असून, पाणीपुरवठ्याच्या सर्व जागी ब्लिचिंग पावडर योग्य प्रमाणात टाकण्याचे काम सुरु केले आहे. त्याचप्रमाणे गावा गावात आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच दोन महिला व पुरुष कर्मचारी यांना घरोघरी जाऊन जुलाब, उलटी, ताप याबाबत सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले आहे. पूरग्रस्त भागात आरोग्य विभागाने तत्काळ करायच्या उपाययोजना आणि पूर ओसरल्यावर करायची कामे यांचे पूर्णपणे नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार काम सुरु असल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले आहे.

आरोग्य नियंत्रण कक्षामधून सातत्याने आढावा –

राज्यातील सर्व पूरग्रस्त भागातील कामाचा आरोग्य नियंत्रण कक्षामधून सातत्याने आढावा घेतला जात आहे. तसेच आरोग्य विभागाचे सहसंचालक तसेच वरिष्ठ डॉक्टर थेट पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष उपस्थित राहून आरोग्यसेवा व्यवस्थित उपलब्ध राहिल, याची काळजी घेत आहेत. पूरग्रस्त गावांसाठी वैद्यकीय पथके, पुरेसा औषध साठा, करोनासह साथीच्या आजारांसाठी तत्काळ आवश्यक त्या चाचण्या करणे, तसेच पूरग्रस्त भागातून सुरक्षित ठिकाणी हलविलेल्या सव्वा लाखाहून अधिक लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असल्याचे देखील डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

डेंग्यू, हिवताप आदी साथीचे आजार पसरू नयेत यासाठी खबरदारी –

प्रामुख्याने गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी युद्धपातळीवर घेण्यात येत आहे. जवळपास १,३५,३१३ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून यात कोल्हापूरमध्ये ४०,८८२ तर सांगलीत ७८,१११ नागरिकांना पूरग्रस्त भागातून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जवळपास सव्वाशे लोक महापूर व दरडी कोसळून मरण पावले आहेत, तर साडेतीन हजाराहून अधिक जनावरे मृत पावली आहेत. जनावरे मरण पावण्याचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता व्यक्त करून जनावरांच्या मृतदेहाची तत्काळ व योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे हे एक मोठे आव्हान असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पूरग्रस्त भागात लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, हिवताप आदी साथीचे आजार पसरू नयेत यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, दुषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी जलसाठे, गळती असलेल्या जल जोडण्या, पाण्याच्या टाक्या यांची व्यापक तपासणी करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. याठिकाणी ब्लिचिंग पावडर, तसेच घरोघरी क्लोरिन टॅबलेट व पावडरचे आणि ओआरएसचे वाटप केले जाणार आहे. तसेच किमान २० टक्के घरांमधील पाणी साठवण व्यवस्थेची तपासणी केली जाणार असल्याचे आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनी सांगितले.

कोकणातील पूरग्रस्त भागात आगामी काळात सर्पदंश व विंचू दंशाच्या घटना वाढू शकतात, हे लक्षात घेऊन संबंधित भागातील आरोग्य रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी औषधसाठा देण्यात आला आहे. पूरग्रस्त भागातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज असून जलदगती वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी ‘रोड मॅप’ तयार करण्यात आला आहे.