News Flash

मदतकार्यास वेग, पूर ओसरू लागला.. भीतीची छायाही दूर

गेले चार दिवस दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराने घातलेला विळखा शनिवारी वेगाने सैलावू लागला.

|| दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे

गेले चार दिवस दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराने घातलेला विळखा शनिवारी वेगाने सैलावू लागला. पावसाने घेतलेली विश्रांती आणि अलमट्टी धरणातून वाढवलेला विसर्ग यामुळे या दोन्ही शहरांतील पाणी झपाटय़ाने उतरू लागले आहे. पूरग्रस्त भागांतील मदतकार्याला वेग आला आहे.

या दोन्ही जिल्ह्यंतील पावणेचार लाख पूरग्रस्त नागरिकांचे सुरक्षित जागी स्थलांतर करण्यात आले आहे. या नागरिकांच्या अन्न, पाणी, निवाऱ्याची करण्यात आलेली सोय; जीवनावश्यक वस्तूंचा सुरू झालेला पुरवठा; प्रशासन, आपत्ती निवारण पथके, लष्कर, पोलीस यंत्रणेसोबतच सरसावलेल्या स्वयंसेवी संस्था यामुळे महापुराने बेहाल झालेली ही दोन्ही शहरे काहीशी सावरू लागली आहेत. कमी होणारे पाणी आणि मदतीचे ओघ यामुळे महापुराबरोबर भीतीची छायाही ओसरू लागली आहे.

गेले पाच दिवस कोल्हापूर-सांगली जिल्ह्यत महापुराचा कहर सुरू होता. कृष्णा-वारणेमुळे सांगली आणि पंचगंगेमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. सुरुवातीचे तीन दिवस या आपत्तीच्या संकटात वाढ होत असताना त्या तुलनेत मदतकार्य मात्र तोकडे पडताना दिसत होते. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारपासून या मदतकार्याने कमालीचा वेग घेतला आणि जोडीला पावसानेही विश्रांती घेतल्याने पूरग्रस्तांची आपत्तीतून सुटका होऊ लागली आहे.

तीन दिवसांत दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर-सांगलीकडे धाव घेतल्याने प्रशासनाबरोबर मदत यंत्रणाही गतिमान झाल्याचे शनिवारी दिसून आले. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, नौदल, पोलीस, जिल्हा प्रशासन, अग्निशमन दल, विविध पालिकांच्या यंत्रणा, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय पथके आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने पुराने बाधित सर्व पावणेचार लाख नागरिकांचे सुरक्षित जागी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये सांगलीतील दीड लाख, तर कोल्हापुरातील तब्बल सव्वादोन लाख नागरिकांचा समावेश आहे. पुरात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी शनिवापर्यंत विविध पथकांच्या दोनशेपेक्षा जास्त बोटींचा वापर करण्यात आला आहे. या सर्व नागरिकांची सध्या ३०६ तात्पुरत्या निवारा शिबिरांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय या दोन्ही शहरांतील मंगल कार्यालये, सभागृहेदेखील यासाठी ताब्यात घेत त्यांचा वापर करण्यात आलेला आहे. स्थलांतरित होणाऱ्या या सर्व नागरिकांच्या अन्न, पाणी आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची सोय शासनाच्या वतीने करण्यात आली.

पाणी ओसरलेल्या ठिकाणी साफसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. ही दोन्ही शहरे आणि पूरग्रस्त ग्रामीण भागातील नागरिकांसाठी गेल्या २४ तासांमध्ये सात टन अन्नाची पाकिटे वितरित करण्यात आली आहेत. याशिवाय हजारो लिटर दूध, बिस्किटे आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वितरणही युद्धपातळीवर सुरू आहे.

इंधनाची कमतरता भासू नये यासाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची कोल्हापूर येथे शनिवारी बैठक झाली. महामार्ग सुरू होताच शहरातील इंधनपुरवठा तत्काळ वाढवण्याची योजना आखण्यात आली आहे. एलपीजी सिलेंडर पुरवठय़ाबाबतही नियोजन करण्यात आले.

जनजीवन लवकवरच पूर्वपदावर

या दोन्ही शहरांना शनिवारी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. काही भागांतील वीजपुरवठाही सुरळीत होऊ लागला आहे. पाणी ओसरू लागल्यावर या दोन्ही शहरांलगतचे रस्तेही आता खुले होऊ लागल्याने खऱ्या अर्थाने जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसत होते.

सांगलीत पुराला उतार

दरम्यान पावसाने घेतलेली विश्रांती आणि अलमट्टी धरणातून वाढवलेला विसर्ग यामुळे या दोन्ही शहरांतील पाणी झपाटय़ाने उतरू लागले आहे. सांगली शहरातील पाण्याची पातळी दर तासाला इंचाने कमी होत आहे. कृष्णा नदीपासून दीड  किलोमीटर अंतरावर असलेला तासगाव रस्ता शनिवारी पहाटे वाहतुकीसाठी खुला झाला. यामुळे शहरात येण्यासाठी आणखी एक मार्ग सुरू झाला आहे. मात्र शहरातील राजवाडा चौक, मध्यवर्ती बस स्थानक, मारुती रोड, गणपती पेठ, वखारभाग, रॉकेल लाइन, कापड पेठ, हरभट रोड, महापालिका मुख्यालय अद्याप पाण्यात आहे. पाणी असलेल्या या भागात नौदल, तटरक्षक दल, व्हाइट आर्मी आणि स्थानिक बचाव पथकांद्वारे २४ तास मदत पोहोचवली जात आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांनी मदतकार्यात स्वत: सहभाग घेतल्याने प्रशासकीय यंत्रणाही वेगाने हालचाली करीत आहे.

दरम्यान पंचगंगेचा पूर शनिवारी ओसरला. शहरातील अनेक भागांतील पाणी ओसरू लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी सुमारे साडेतीन फुटांपेक्षा जास्त प्रमाणात कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. महामार्गावरील पाणी ओसरले असले तरी हा मार्ग पूर्णपणे मोकळा न झाल्याने आज सलग पाचव्या दिवशी पुणे-बेंगळुरू महामार्ग वाहतुकीसाठी बंद होता. या मार्गावर थांबलेल्या वाहनचालकांच्या अन्न-पाणी आणि सुविधांची प्रशासनाच्या जोडीनेच स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून सोय करण्यात आली.

कोल्हापूर परिसरातील बचावकार्य बरेचसे पूर्ण झाले असून आता महापुराची भीषणता असलेल्या जिल्ह्य़ाच्या पूर्व भागाकडे लक्ष दिले आहे. विशाखापट्टणमधून नौदलाचे १५ जणांचे पथक बोटीसह शिरोळमधील पूरग्रस्तांसाठी सायंकाळी रवाना झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

दरम्यान शासकीय यंत्रणेबरोबरच विविध सामाजिक संस्थाही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता धावून आल्या आहेत. यामुळे या आपत्तीवर मात करण्यात मोठी मदत होऊ लागली आहे. राज्याच्या अनेक भागांतून अन्न, धान्य, कपडे, औषधे या स्वरूपाची मदत या पूरग्रस्त भागात मोठय़ा प्रमाणात येऊ लागली आहे. दोन्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने या मदतीच्या वाटपासाठी समन्वय कक्षही सुरू करण्यात आलेले आहेत.

अलमट्टी धरणातून होणारा शनिवारी विसर्ग पाच लाखांहून अधिक करण्यात आल्याने या दोन्ही जिल्ह्य़ांत असलेली पूरस्थिती झपाटय़ाने ओसरू लागली आहे. हा विसर्ग असाच सुरू राहिला आणि पावसाने विश्रांती घेतली तर उद्या सायंकाळपर्यंत पुराने विळखा घातलेला हा भाग मोकळा होण्यास मदत होईल.

वैद्यकीय शिबिरे

स्थलांतरित तसेच इतर पूरग्रस्त नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी जागोजागी वैद्यकीय शिबिरे सुरू करण्यात आलेली आहेत. उपलब्ध दवाखाने, रुग्णालयांच्या जोडीने तात्पुरत्या स्वरूपातील दवाखाने सुरू करण्यात आलेले आहेत. यासाठी जिल्ह्य़ातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तसेच स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 1:50 am

Web Title: flood in maharashtra mpg 94
Next Stories
1 अश्रूंचाही महापूर
2 देशभरातून मदत मिळवून पूरग्रस्तांना वाचवणार
3 गावठी बंदुका विकणारा अटकेत
Just Now!
X