News Flash

अमरावती विभागात पूरस्थिती

सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे विभागातील सर्वच धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.

मेळघाटातील सिपना नदी पुलाला लागून वाहणारे पाणी. 

अमरावती : विभागातील पाचही जिल्ह्य़ांत सर्वदूर पाऊस सुरू असून अकोला जिल्ह्य़ात पावसाची तीव्रता जास्त आहे. विभागात गेल्या चोवीस तासांत बारा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक १६८ मि.मी. पाऊस अकोला जिल्ह्य़ातील बार्शीटाकळी तालुक्यात नोंदवण्यात आला. अमरावती जिल्ह्य़ातील चिखलदरा तालुक्यात सिपना नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

विभागात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. अमरावती जिल्ह्य़ात आतापर्यंतच्या सरासरीच्या १०६ टक्के, अकोला जिल्ह्य़ात १११ टक्के, बुलढाणा जिल्ह्य़ात १२८ टक्के, वाशीम जिल्ह्य़ात १४६ तर यवतमाळ जिल्ह्य़ात १४१ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात अकोला जिल्ह्य़ातील बाळापूर, पातूर, अकोला, बार्शीटाकळी, बुलढाणा जिल्ह्य़ातील लोणार, यवतमाळ जिल्ह्य़ातील दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव आणि वाशीम जिल्ह्य़ातील मंगरूळपीर, मानोरा तसेच कारंजा या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.

धरणांमधील साठा वाढला

सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे विभागातील सर्वच धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. विभागातील बेंबळा या मोठय़ा प्रकल्पाची दोन दारे १० से.मी. उघडण्यात आली असून या धरणातून २० घनमीटर प्रतिसेकं द विसर्ग सुरू आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाचा जलसाठा हा ४७.६४ टक्के झाला आहे. पूस प्रकल्पात ७६.२९, अरुणावती ५६.०७, बेंबळा ६५.६८, काटेपूर्णा ५१.९२, वान ३४.१४, नळगंगा २८.४५ आणि पेनटाकळी प्रकल्पात ३२.५० टक्के पाणीसाठा झाला आहे. विभागातील सर्व नऊ मोठय़ा प्रकल्पांमध्ये ६७२.७५ दशलक्ष घनमीटर म्हणजे ४८.०६ टक्के  जलसाठा झाला असून मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठा ३६१.५९ दलघमी (४९.३२ टक्के) तर लघू प्रकल्पांमध्ये ३५६.८१ दलघमी (३१ टक्के) जलसंचय झाला आहे.

पूर्णा धरणाची सर्व दारे उघडली.

चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाच्या जलसाठय़ात चार दिवसांमध्ये झपाटय़ाने वाढ झाल्याने धरणाची सर्व नऊ दारे २० से.मी. उघडण्यात आली असून प्रतिसेकं द १२३ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कळमेश्वरात अतिवृष्टी

नागपूर : कळमेश्वरात सकाळी ११ वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत अतिवृष्टी होऊन ७८.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार भुजाडे यांनी दिली. या अतिवृष्टीमुळे कळमेश्वर-काटोल मार्गावरील खडकनाला येथे वाहतूक थांबवून ती वळणमार्गाने काढण्यात आली. कळमेश्वर-गोवरी मार्गावरील नाल्यालाही पूर आला आहे. शेतमजूर नाल्याच्या काठावर अडकले होते. या पुराचे पाणी लगतच्या वस्तीमध्ये शिरले आहे.  तालुक्यातील शेते जलमय झाली आहेत. नदीकाठाच्या गावातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. धापेवाडा येथील चंद्रभागेलाही पूर आला असून तेथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दहीगावातील संरक्षण भिंत फुटली

अमरावती : अंजनगाव सूर्जी तालुक्यातील गरजदरी लघु प्रकल्प पूर्ण भरला असून धरणातील सांडव्यावरून वाहणारे पाणी दहीगाव  येथील संरक्षण भिंत फु टल्याने गावात शिरले आहे. पुरामुळे घरांचे आणि शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.

धरणातील पाणी दहीगावात शिरू नये म्हणून बऱ्याच वर्षांआधी नाल्यावर एक संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. ही भिंत अलीकडे कमकु वत झाली. गरजदरी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी या भिंतीला धडकले आणि  ही भिंत फु टली. यामुळे पुराचे पाणी दहीगाव येथे शिरले. पाण्याच्या प्रवाहात शेती खरडून गेली. मंगेश अढाऊ यांचे घर पडले. सर्व कु टुंबीय दवाखान्यात होते, त्यामुळे ते बचावले.

यवतमाळ जिल्ह्य़ातील ७८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

यवतमाळ : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गुरुवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. उमरखेड, महागाव, पुसद, दिग्रस, नेर, वणी, झरी जामणी आदी तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. उमरखेड, महागाव, पुसद तालुक्यात पावसाने अधिक नुकसान झाले. अनेक नदी, नाल्यांना पूर आला आहे. उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य परिसरातील जवळपास ४० गावांचा गुरुवारी सकाळी संपर्क तुटला होता. दरम्यान उमरखेड तालुक्यात नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या युवकाला वाचवण्यात प्रशासनाला यश आले.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला. उमरखेड, पुसद, महागाव या तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील अनेक नदी, नाले ओसंडून वाहत होते. उमरखेड तालुक्यातील ढाणकी, गांजेगाव, कुपटी, बिटरगाव, दहागाव यासह अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. दहागावजवळील नाल्याच्या पुरात कुपटी येथील विजय दत्ता इलतकर हा युवक वाहून गेला. प्रसंगावधान राखून त्याने एका झाडाची फांदी पकडून ठेवली. प्रशासनाने तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन करून या युवकास पुरातून बाहेर काढले. पावसामुळे उमरखेड तालुक्यात सर्वाधिक ३४ घरांची पडझड  झाली. तर ७५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. याशिवाय दिग्रस, नेर, केळापूर, वणी, झरी जामणी तालुक्यात पावसामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाली. पुसद तालुक्यातही पावसाने शेती खरडून गेल्याने नुकसान झाले. पुरामुळे पैनगंगा अभयारण्यातील ४० गावांचा आज सकाळी संपर्क तुटला होता. मात्र दुपारनंतर परिस्थिती पूर्वपदावर आली.

उमरखेड, पुसद, ढाणकी, हिमायतनगर व अन्य भागातील वाहतूकही पुरामुळे काही काळ ठप्प झाली होती. बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात इतर ठिकाणी कोणतेही धरण, प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने भरले नाही.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 12:26 am

Web Title: flood situation in amravati division zws 70
Next Stories
1 अकोला जिल्हय़ात अतिवृष्टीमुळे हाहाकार
2 रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांचा मुद्दा आता पालकमंत्र्यांच्या दारी
3 पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपले
Just Now!
X