सांगली : परतीच्या मान्सूनने रात्रभर जोरदार हजेरी लावल्याने कृष्णा नदीकाठी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून नदीकाठी सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. सांगलीत नदीकाठी स्थलांतरित होण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या असून ग्रामीण भागातील ओढे-नाले यांना पूर आल्याने काही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत. औदुंबर येथील दत्त मंदिरात चौथ्यांदा पाणी शिरले असून दमदार पावसाने खरीप हंगामातील सुगी धोक्यात आली असून द्राक्ष बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

रविवारी रात्रीपासून जिल्ह्य़ाच्या सर्वच भागात दमदार पाऊस सुरू झाला होता. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत होत्या. यामुळे एका रात्रीत कृष्णा नदीची पाणी पातळी ३१ फूट ७ इंचावर पोहोचली. यामुळे अंकलखोप- आमणापूर मार्गावर असलेल्या पुलावर पाणी आले. वाहतूक अद्याप सुरू असली तरी कोयनेतूनही विसर्ग सुरू करण्यात आल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अग्रणी नदीला पूर आला असून यामुळे कवठेमहांकाळ ते हिंगणगाव, कवठेमहांकाळ-देशिंग मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. तर जत तालुक्यातील तिकोंडी-कोंत्येवबोबलाद या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. तर तासगाव तालुक्यातही अग्रणी नदीमुळे काही गावातील वाहतूक बंद झाली असून पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

सांगली शहरातील नदीकाठी असलेल्या सूर्यवंशी प्लॉट, साईनगर, इनामदार प्लॉट, दत्तनगर आदी भागांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी ध्वनिवर्धकावरून केले.

परतीच्या मान्सूनने खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बाजरी या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या आणि मळणीच्यावेळी पावसाचा जोर असल्याने आलेले पिक वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर द्राक्षाची फळछाटणी झाली असून बागामध्ये पाणी साचले आहे. तसेच संततधार पावसाने द्राक्ष पिकावर दावण्या म्हणजेच पावडरी मिल्ड्यू या बुरशीजन्य रोगाचे आक्रमण झाले आहे. या रोगाला आळा घालण्यासाठी औषध फवारणीही सततच्या पावसाने निरूपयोगी ठरत असल्याने उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

जिल्ह्य़ात एका रात्रीत सरासरी ४६.१० मिलीमीटर पाऊस झाला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ६७.८ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. तालुकानिहाय झालेला पाऊस असा मिरज ३१, जत ३१.८, खानापूर ३९.४, वाळवा ५१.५, तासगाव ४८.५, आटपाडी ५४.३, कवठेमहांकाळ ४१, पलूस ५३.५ आणि कडेगाव ५० मिलीमीटर.

गेल्या ३४ तासात झालेला पाऊस आणि हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेऊन कोयना धरणातून ८ हजार ४६४ क्युसेक आणि चांदोली धरणातून २ हजार ८५७ क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन जिल्हा  प्रशासनाकडून करण्यात आले आहे.