सततच्या पावासामुळे ओढे,नाले भरून वाहिले. त्यातच उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, याचा परिणाम पंढरपूर शहर आणि नदीकाठच्या गावांवर झाला असून अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती ओढावली आहे. शहरातील नदीकाठच्या जवळपास ८०० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे तसेच ग्रामीण भागात देखील नागरिकांना स्थलांतरीत केले आहे.
पंढरपूरकडे येणारे सातारा, पुणे सोलापूर, मंगळवेढा या ठीकाणची वाहतूक बंद केली तर काही ठिकाणी वळविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. दरम्यान,चंद्रभागा नदीत येणारा पाण्याचा विसर्ग पाहता दुपार पर्यंत शहरातील अनेक भागात पुराचे पाणी जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
पंढरपूरला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. बुधवारी कुंभार घाटावरील भिंत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला होता. या सततच्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. गेल्या २४ तासात पंढरपूर तालुक्यात तब्बल १४१.८९ मि.मी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. यात पंढरपूर मंडळात सर्वाधिक म्हणजे १५७ त्या खालोखाल पुळूज १५६,चळे १५२ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. इतर मंडलात १३० ते १४० मि.मी. इतका मोठ्या प्रमाणत पाऊस पडला आहे. त्यामुळे परिसरातील ओढे,नाले भरून वाहू लागले.ते पाणी चंद्रभागा नादित जाऊन मिसळले. त्यात भर म्हणून उजनी आणि वीर धरणाचे पाणी मिसळून नदीने धोक्याची पातळी ओलांडली.
व्यास नारायण, अंबाबाई पटांगण,लखुबाई, आंबेडकर नगर झोपडपट्टी आदी भागातील जवळपास ५०० कुटुंबांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केली. आज सकळी अजून ३०० असे एकूण ८०० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. उजनी धरण आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे शहरातील काही भागात दुपार पर्यंत पुराचे पाणी जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जीव रक्षक, एनडीआरएफची टीम तैनात केली आहे.
नागरिकाना सतर्कतेचा इशार दिला आहे. तर दुसरीकडे पंढरपूर ते सातारा,पुणे,सोलापूर,मंगळवेढा याठीकाणचे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवली आहे. काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु केली आहे .एकंदरीत एकीकडे करोनाचे संकट असताना आता दुसरीकडे पुराचा फटका तालुक्याला बसला आहे. तर या अतिवृष्टीचा फटका बळीराजाला देखील बसला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 10:39 am