सुहास बिऱ्हाडे

७ ते १० जुलै २०१८ या काळात वसईत अतिवृष्टी आणि पुरामुळे हाहाकार उडाला होता. वसईचे जनजीवन ठप्प झाले होते. वीजपुरवठा, उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ा बंद पडल्या. मोबाइल बंद पडले. रस्ते बंद झाले. वाहने बंद पडली. लोकांच्या घरात पाणी गेले. काही दिवस वसईकरांचा उर्वरित जगाशी संपर्क तुटला. शेकडो कोटींचे नुकसान झाले.. वसईला हादरविणारा हा पूर कसा होता, त्याची ही आठवण..

पाच जणांचे बळी

अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यात नाल्यात वाहून आणि बुडून पाच जणांचा बळी गेला. विरारमध्ये प्रकाश पाटील या शाळेच्या बसचालकाचा नारिंगी येथे नाल्यात वाहून मृत्यू झाला. नायगाव पूर्वेला राहणाऱ्या श्रीमंत जाधव यांचा सोमेश्वरनगरातील नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. राजावली येथे बनवारी गुप्ता यांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. नालासोपारा येथे मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नारायण जाधव आणि नामदे पारधी या दोघांचा नाल्यात वाहून मृत्यू झाला.

बेकायदा पुलामुळे पाणी तुंबले

नायगाव पूर्वेला राजावली खाडीवर असलेल्या एका पुलाने खाडीतून शहराचे पाणी जाण्याचा मार्ग बंद केला होता. खाडी ४० फूट रुंद होती. खाडीत भराव टाकून, सिमेंट वाहिन्या बसविलेल्या होत्या. त्यावर लोखंडी पूल उभारण्यात आला होता. त्यामुळे खाडीचे पात्र अरुंद झाले. दोन वर्षांपूर्वी हा पूल उभारण्यात आला होता. हा पूल कोणी उभारला, याची माहिती मिळाली नाही. पुराचे पाणी साचल्यानंतर पूल तोडण्यात आला.

एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये प्रवासी अडकले

नालासोपारा, वसईच्या रेल्वे स्थानकात पाणी साचल्यामुळे दुरान्तो एक्स्प्रेस, अवंतिका एक्स्प्रेस, सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस, पनवेल मेमू आदी लांब पल्ल्याच्या गाडय़ा बोईसर, सफाळे, पालघर आदी स्थानकांत खोळंबल्या. नालासोपारा स्थानकात वडोदरा एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आदी गाडय़ांना थांबवून ठेवण्यात आले होते. या वडोदरा आणि शताब्दी रेल्वेगाडय़ांमधील प्रवाशांची रात्री राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, तुळिंज पोलिसांनी सुटका केली. या प्रवाशांची खासगी बसमधून मुंबईला रवाना करण्यात आले.