आपत्ती व्यवस्थापन विभागाने यावर्षीच्या पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थितीचा आढावा घेतला असून अमरावती विभागाच्या पाच जिल्ह्यातील ९१६ गावे ही संभाव्य पूरबाधित म्हणून घोषित करण्यात आली आहे. पुराच्या संभाव्य धोक्यामुळे ७ लाख २५ हजार नागरिकांना झळ पोहोचणार आहे. त्या दृष्टीने पूर्वतयारी व प्रतिबंधात्मक उपायोजनांना प्रारंभ करण्यात आला आहे.
अमरावती येथील आयुक्त कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाचही जिल्ह्यातील पुराचा संभाव्य धोका असलेल्या गावांचा शोध घेण्यात आला आहे. या गावांमध्ये खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, संभाव्य अतिवृष्टी आणि पुरामध्ये नागरिकांच्या बचावासाठी संबंधित आपत्ती व्यवस्थापन काम करणाऱ्या विविध यंत्रणांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. याबाबत अमरावती येथील विभागीय आयुक्तांनी शासनाकडे अहवाल सादर केला आहे. यानुसार संभाव्य पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी विभागाच्या पाचही जिल्ह्यांमध्ये १८९४ तात्पुरते निवारे आणि ३१०३ निष्णात जलतरण पटू उपलब्ध आहेत.
पूरस्थिती हाताळण्यासाठी १२ रबर बोटी, ११ फायबर बोटी, ७०२ लाइफ जॅकेट, ११४ रोप बंडल, २१५ शोध बचाव पथके , १८५ प्राथमिक उपचारतज्ज्ञ, स्कूबा डायव्हर्स, १२ अशासकीय संस्था, तसेच इतर यंत्रसामुग्री उपलब्ध आहे.
नदी-नाल्याकाठचे अतिक्रमण, झाडेझुडपे साफ करणे, पुराचे पाणी साचणार नाही, यासाठी पाण्याला मार्ग काढून देणे ही कामे केली आहेत. दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरतात. लोंबकळलेल्या विद्युत तारांचा नागरिकांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. आवश्यक सामुग्री, दूरध्वनी, वायरलेस यंत्रणा, पर्यायी वीजव्यवस्था, आदी यंत्रणा सुरळीत ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. विभागातीला ४२ मोठय़ा नद्यांमुळे ५८४, तर ६९ लहान नद्या आणि नाल्यामुळे ३३२ गावांना पुराचा धोका आहे.
पूरपरिस्थिती उद्भवल्यास सुमारे ७ लाख २५ हजार नागरिक बाधित होऊ शकतात. विभागीय, तसेच जिल्हा, तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या नियंत्रण कक्षात मदतकार्य करणाऱ्या सर्व संबंधितांचे संपर्क क्रमांक लावण्यात आले आहेत.