पालीतील आदिवासी आश्रमशाळेत पुराचे पाणी; शालेय वस्तू वाहून गेल्याने शैक्षणिक नुकसान

रमेश पाटील, वाडा

रविवारी झालेल्या महाप्रलयात पिंजाळी नदीने धोक्याची पातळी ओलांडून नदीकाठच्या अनेकांचे संसार तर वाहून नेलेच पण या नदीकाठी पाली येथे असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या शासकीय आश्रमशाळेतील इमारतींमध्ये पिंजाळी नदीच्या पुराचे पाणी दहा फूट उंचीपर्यंत शिरल्याने येथील चारशे विद्यार्थ्यांचे कपडय़ांसह शैक्षणिक साहित्य वाहून गेले आहे. विद्यार्थ्यांना वेळीच सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याने संभाव्य मोठा धोका टळला.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांची आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पहिली ते दहावीपर्यंत शासकीय आश्रमशाळा वाडा तालुक्यातील पाली येथे पिंजाळी नदीकाठी आहे. या आश्रमशाळेत एकूण ६२१ विद्यार्थी असून यातील ४३० विद्यार्थी-विद्यार्थिनी निवासी आहेत.

शनिवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रविवारी सकाळी पिंजाळी नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे शिक्षकांनी शनिवारी सायंकाळी विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवले होते. मात्र या विद्यार्थ्यांच्या कपडय़ांच्या पेटय़ा, कपडे, वह्य़ा, पुस्तके आणि अन्य शालेय शैक्षणिक साहित्य हे आश्रम शाळेतच अडकून पडले होते. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास पिंजाळी नदीला आलेल्या महापुराने या आश्रमशाळेला वेढा दिला. येथील विद्यार्थ्यांच्या १२ वर्ग आणि निवासी खोल्यांमध्ये दहा फुटांपर्यंत पुराचे पाणी गेल्याने निवासी खोल्यांमध्ये असलेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य, कपडे गाद्या आदी साहित्य पुरात वाहून गेले. काही साहित्य वर्ग खोल्यांमध्ये अडकून पूर्णत: खराब झाले आहे.

पिंजाळी नदीला मोठय़ा प्रमाणावर पूर आल्यावर पाली आश्रमशाळेत पाणी जात असते. येथे नेहमीच उद््भवणारी स्थिती पाहता या आश्रमशाळेची नवीन इमारत नदीपात्रापासून काही अंतरावर बांधण्यात आली आहे. मात्र या इमारतीत पाच वर्षांपासून बुधावली येथील आश्रमशाळा भरत आहे. बुधावली येथील इमारत धोकादायक झाल्यापासून येथील साडेतीनशे विद्यार्थी पाली येथे गेल्या पाच वर्षांपूर्वीच स्थलांतरित केली आहेत.

दरम्यान येथील सर्वच वर्गखोल्यांमध्ये पुराच्या पाण्यात आलेली घाण, गाळ, साप अडकल्याने हे वर्ग साफसफाई होईपर्यंत व जंतुनाशक फवारणी होईपर्यंत येथील सर्व विद्यार्थ्यांना दहा दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पिंजाळी नदीने धोक्याची पातळी ओलांडण्यापूर्वीच सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून येथील सर्व विद्यार्थी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते, असे आदिवासी विकास प्रकल्प जव्हारचे  साहाय्यक प्रकल्प अधिकारीअनिल सोनावणे यांनी सांगितले.

पूरपाणी आश्रमशाळेत घुसल्याने शाळेतील सर्वच साहित्य, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य तसेच नदीच्या पुरात आलेल्या गाळाने वर्ग खोल्या अत्यवस्थ झाल्या आहेत. येथील घाणीमुळे कुठलीही रोगराई येऊ  नये म्हणून वरिष्ठांच्या परवानगीने विद्यार्थ्यांना काही दिवस सुट्टी दिली आहे, असे  पाली आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक के. एन. पाटील म्हणाले.