28 September 2020

News Flash

सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात नद्यांना पूर

२४ तासांत ६ इंच पाऊस,  शेती, बाजारपेठा जलमय, महामार्गावर वाहतूक विस्कळीत

संग्रहित छायाचित्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी सुरू झालेला पावसाचा धुमाकूळ चालूच असून बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण सरासरी ६ इंच पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ८ तालुक्यांपैकी ४ तालुक्यांमध्ये ४ इंचांपेक्षा जास्त, तर दोडामार्ग आणि वैभववाडी या दोन तालुक्यांमध्ये तब्बल आठ इंचांपेक्षा जास्त पाऊस कोसळला आहे.

जिल्ह्यातील बांदा, तळवडे, खारेपाटण, कुडाळ येथील लोकवस्ती आणि बाजारपेठेत पाणी घुसले. तीन नदीपात्राशेजारील लोकांना धोक्याचा इशारा दिला आहे. तसेच कुडाळ तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील दहाजणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

कणकवली शहर आणि तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु असल्याने गड आणि जाणवली या दोन्ही नद्यांची पात्रे दुथडी भरून वाहत आहेत. पावसाबरोबर असलेल्या जोरदार  वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजेच्या तारांवर झाडे पडून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच वरवडे आणि कणकवली कासरल या मार्गावरील वागदे येथील कॉजवेवर पाणी आले आहे. खारेपाटण शहरात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती कायम राहिली आहे. मध्यरात्री एक वाजल्यानंतर शहरात पुराचे पाणी आल्याने व्यापारी वर्गाची मोठी धावपळ उडाली ह्य़ा बाजारपेठेत दोन फुटापर्यंत पाणी होते. पावसाचा जोर पाहता पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.? शहरालगत वाहणाऱ्या सुख नदीला वैभववाडी आणि राजापूर तालुक्यातील सहा उपनद्यांचे पाणी येऊन मिळते. गेले दोन दिवस या दोन्ही तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने सुखनदीला पूर आला आहे. त्यामुळे खारेपाटण शहरात पुराचे पाणी मोठय़ा प्रमाणात येण्याचा धोका वाढला आहे. शहरात येणारे दोन्ही मार्ग पाण्याखाली गेले आहेत. जैनवाडीकडे जाणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील बांदा, तळवडा बाजारात पाणी घुसले, बांदा शहराला गतवर्षीच्या महापुराची भिती निर्माण झाली आहे गतवर्षी ५ ऑगस्ट रोजी आलेल्या महापुरामुळे बांदा येथील व्यापाऱ्यांची मोठी नुकसानी झाली होती. यंदाही या दिवशी बांदा, तळवडे, ओटवणे, इन्सूली,सांगेलीसह ग्रामीण भागात नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. कुडाळ तालुक्यातील आंबेरी नदीला पूर आलेल्या पुरामुळे २७ गावांचा संपर्क तुटला होता.

तसेच कुडाळ शहरातील नदीला पूर आल्यानंतर एका इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले.म् वेंगुर्ले, मालवण व देवगड या सागरी किनारपट्टी वर वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पुरासोबतच झाडेही उन्मळून पडली .

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाची पातळी १०९.३६ मीटर झाली आहे. तिलारी नदीची धोका पातळी ४३.६० मीटर असून बुधवारी ४१.६० मीटर या इशारा पातळीवर नदीची पूरस्थिती होती.

कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीची पातळी १० मीटर असून धोका पातळी १०.९१ मीटर आहे. तसेच कणकवली तालुक्यातील वाघोटन नदीची पातळी ७ मीटर असून धोका पातळी १०.५०० मीटर आहे. अतिवृष्टीमुळे तीनही नद्या काठावरील लोकांना सुरक्षिततेसाठी आवाहन प्रशासनाने केले आहे.

बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १५१.४ मिलीमीटर पाऊस झाला असून दोडामार्ग (२७९ मिमी) आणि वैभववाडी या दोन तालुक्यांमध्ये (२३७) अतिवृष्टी झाली. त्याचबरोबर, कुडाळ (१७५), मालवण (१२१), वेंगुर्ले (११५) आणि सावंतवाडी (११०मिमी) या इतर चार तालुक्यांमध्येही शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. त्या तुलनेत देवगड (९५) आणि कणकवली (७९ मिमी) पावसाचे प्रमाण कमी राहिले. दरम्यान, गुरुवारीही जिल्ह्यात पावसाची संततधार चालूच राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 12:19 am

Web Title: flooding of rivers in sindhudurg ratnagiri district abn 97
Next Stories
1 विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी कोसळली
2 महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस
3 राज्यात दिवसभरात १० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित; ६ हजार १६५ जण करोनामुक्त
Just Now!
X