मुंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मालवाहतूकदारांना बसला आहे. अनेक गाड्या कोल्हापूर सीमेवर आणि कोकणात अडकून पडल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडे होणारी मालवाहतूक ठप्प झाली असून उद्योगिक उत्पादने आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा प्रभावित झाला आहे.

पावसामुळे कोल्हापूरकडून मुंबईत येणाऱ्या तांदूळ आणि साखरेच्या मालाची वाहतूक थांबली आहे. तसेच निर्यात मालही गाड्यांमध्येच पडून आहे. ‘सध्या कोसळणाऱ्या पावसामुळे परराज्यात आणि कोल्हापूरमध्ये मालवाहतूक करणाऱ्या सुमारे २५०० गाड्या सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकच्या सीमाभागात अडकल्या आहेत. त्यातच करोना निर्बंध आणि पावसामुळे ढाबे बंद असल्याने चालकांच्या अन्नाचा तुटवडा जाणावत आहे,’ असे मुंबई मराठी वाहतूक व्यापार सेनेचे अध्यक्ष अशोक राजगुरू यांनी सांगितले.

पावसामुळे दक्षिणेकडील राज्यात माल वाहतूक करण्यास चालक तयार नाहीत. रस्ता बंद झाल्याने वाहतूकदारांचा खर्च वाढला आहे. परिणामी काही काळ ३० टक्के भाडेवाढ करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्टचे काँग्रेसचे महासचिव (महाराष्ट्र) चिराग कटारिया यांनी सांगितले. पावसात अडकलेल्या गाड्यांमध्ये पाणी शिरून मालाचे नुकसान झाल्याचे प्रकारही घडले आहेत. ‘पावसात ८ गाड्या अडकल्या होत्या. त्यामध्ये कोल्हापुरातील साखर कारखान्यातून जयगडमधील आंग्रे बंदरात निर्यातीसाठी चालविलेली साखर होती. ट्रकमध्ये पाणी शिरून साखर भिजली. आता खराब झालेल्या १० लाख रुपयांच्या साखरेच्या नुकसानीचे पैसे कंपनीला देण्याची वेळ आली आहे,’ अशी माहिती पराग जोग यांनी दिली.

निर्यातीवर परिणाम

मुंबई-गोवा मार्गावरून आणि कोल्हापूरकडून निर्यातीसाठी येणारा माल बंद झाला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांत जेएनपीटी बंदरातील मालाची आवक १० ते १५ टक्क्यांनी घटली आहे. यामध्ये औद्योगिक माल, कृषी उत्पादने या दोन्हींचा समावेश आहे, असे महाराष्ट्र हेव्ही व्हेहीकल कंटेनर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी सांगितले.

उद्योगांवर परिणाम

‘जयगड येथील एका कोळशावरील विद्युत प्रकल्पातून ‘फ्लाय अ‍ॅश’ची  वाहतूक मुंबई, कोल्हापूर, पुणे आणि कर्नाटकातील सिमेंट उत्पादक, आरएमसी प्लँट आणि ब्लॉक मॅन्युफॅक्चरर यांना होते. सध्या कोकणातील रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्त्यांनाही हानी पोहचली आहे. त्यामुळे वाहतूक बंद पडल्याने कारखान्यांना होणारा ‘फ्लाय अ‍ॅश’चा पुरवठा थांबला आहे,’ अशी माहिती सह्याद्री रोडवेजचे पराग जोग यांनी दिली.

भाजीपाला आवक घटली

नवी मुंबई :  अतिवृष्टीमुळे वाशीतील एपीएमसी  बाजारात भाज्यांची आवक २५ ते ३० टक्के घटली आहे. मात्र याचा दरावर कुठलाही परिणाम झाला नाही. मात्र पाऊस असाच सुरू राहिला तर पुढील आठवड्यात भाज्यांचे दर कडाडण्याची शक्यता आहे.