उड्डाणपुलाचा सरकारने चालवला खेळ-सत्यजित तांबे

शहरातील नियोजित उड्डाणपुलाचा अद्यापि प्रकल्प अहवाल तयार झालेला नाही, निविदा नाही, कार्यारंभ आदेशही दिला गेलेला नाही, त्यामुळे केवळ श्रेयासाठी सरकार व भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची तारीख जाहीर करण्याचा पोरकटपणा केला. नगरच्या विकासात उड्डाणपूल मैलाचा दगड ठरणार असतानाही सरकार व खा. गांधी यांनी या कामाचा खेळ चालवला आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला आहे.

मुंबईत झालेल्या बैठकीनंतर खा. गांधी यांनी उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज, दि. १४ रोजी उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार असल्याचे महिन्यापूर्वी जाहीर केले होते. या पाश्र्वभूमीवर तांबे यांनी हा आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालो तरी आपण नगरकरांच्या अस्मितेचा विषय म्हणून उड्डाणपुलाच्या कामासाठी पाठपुरावा करत आहोत, त्यासाठीच केंद्रीय मंत्री गडकरी यांना भेटलो होतो. काम होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील, त्यासाठी आवश्यकता भासली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आपण भेटू, असेही तांबे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

म्हैस पाण्यात असताना तिचा सौदा करण्याचा हा घाईचा प्रकार खा. गांधी यांनी केवळ श्रेयवादातूनच केला, असा आरोप करून तांबे म्हणाले की, यापुढे श्रेयवादासाठी घाई न करता सरकारने उड्डाणपूल कालमर्यादा ठरवून पूर्ण करावा व थेट लोकार्पण सोहळाच करावा, मात्र त्याचा खेळखंडोबा करु नये, अन्यथा नगरकरांचा सत्ताधाऱ्यांवर विश्वास राहणार नाही. श्रेय कोणीही घ्यावे परंतु पूल उभारावा, यासाठी लोकांचा लढाही उभा राहणे आवश्यक आहे. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सरकारची प्रतिमा केवळ भूमिपूजन स्पेशालिस्टच झाली आहे, असे कळवले होते, कदाचित त्याची दखल घेऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला नसावा.

आमदारही लक्ष्य

सत्यजित तांबे यांनी भाजपचे खासदार गांधी यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनाही लक्ष्य केले. निवडणूक होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला, या दरम्यानचा लेखाजोखा नगरकरांनी आमदार व खासदारांकडून घ्यावा व आत्मपरीक्षण करावे. पालकमंत्र्यांसह खासदार व आमदारांना उड्डाणपुलाचे काम मार्गी लावता आलेले नाही, हे वास्तव आहे.