जिल्ह्य़ात वर्षभरात १३ उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : समर्पित मालवाहू मार्ग अर्थात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (डीएफसी) च्या उभारणीचे काम सुरू आहे.  या प्रकल्पाअंतर्गतच  पालघर जिल्ह्यला तेरा नवीन उड्डाणपूल मिळणार आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या पुलांपेक्षा नवीन पूल अधिक उंचीचे असून या पुलांची उभारणी मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पालघर, बोईसर व सफाळा परिसरातील दळणवळण करण्यास सुलभता होणार आहे.

सद्य:स्थितीत कपासे (सफाळे), पालघर, बोईसर, डहाणू व विरार येथे रेल्वे उड्डाणपूल अस्तित्वात आहेत. इतर ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग (फाटक) यांचा वापर करून पूर्व-पश्चिम भागाचा संपर्क राखला जातो. उपनगरीय क्षेत्रात गाडय़ांची संख्या वाढली आहे.  समर्पित मालवाहू मार्ग कार्यान्वित होत आहे. त्याचप्रमाणे नव्या पुलांची आवश्यकता भासली आहे. या भागाचा होणारा विकास पाहता पालघर जिल्ह्यच्या भागात तब्बल १३ पुलांची उभारणी सुरू आहे. त्याकरिता लागणाऱ्या ९८ टक्के जागेचे संपादन झाले असल्याचे सांगण्यात आले.  या तेरा पुलांपैकी दहा पुलांची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे तर तीन पूल डीएफसी स्वतंत्रपणे उभारत आहेत.  अस्तित्वात असलेल्या सध्याच्या पुलांची उंची आठ मीटर इतकी असून नव्याने उभारण्यात येणारे पूल रेल्वे रुळापासून दहा मीटर उंचीचे असणार आहेत. सद्य:स्थितीत पश्चिम रेल्वेचे दोन रेल्वे ट्रॅक कार्यरत असले तरी विरार-डहाणू दरम्यान चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.  त्यामुळे चौपदरीकरणाच्या भागासाठी ३० ते ३६ मीटर तसेच मालवाहू मार्गासाठी २४ मीटर असे एकंदरीत ५४ ते ६० मीटर रुंदीचे नवीन पूल उभारण्यात येणार आहेत. या पुलांचे काम प्रगतिपथावर असून हे सर्व पूल मार्च २०२२ पर्यंत कार्यरत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पालघर मुख्यालयाजवळ चार पूल

पालघर हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून सिडकोमार्फत या भागात सुमारे ३३४ हेक्टर जमीन विकसित केली जाणार आहे. त्याचप्रमाणे या परिसरात सध्या सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांचा अभ्यास करून पालघर परिसरात चार उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येत आहे. यामध्ये नवली रेल्वे फाटकावरील पूल, अस्तित्वात असलेल्या चार रस्ता ते गोठणपूर भागात नवीन पूल, जिल्हा मुख्यालय कोळगाव ते नंडोरे पूल व काही अंतरावर उमरोळी पूर्व- पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलाचा समावेश आहे.

केळवे रोड  दुर्लक्षित

केळवे रोड पूर्व-पश्चिम भागाला जोडण्याकरिता दोन रेल्वे फाटकांचा सध्या समावेश असला तरीही समर्पित मालवाहू मार्ग प्रकल्पांतर्गत रोठे व चौकीपाडा याठिकाणी भुयारी मार्ग (अंडरपास) देण्याचे प्रस्तावित केले होते. या परिसरात सरासरी २२०० मिलिमीटर पाऊस होतो.  परिसरातील भौगोलिक रचना पाहता भुयारी मार्ग पावसाळ्याच्या कालावधीत पाण्याखाली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांची मागणी विचाराधीन घेऊन जिल्हा प्रशासनाने या भागात उड्डाणपूल उभारण्याचे सूचित केले होते. मात्र उड्डाण पुलाच्या ठिकाणाबाबत अनेकदा पाहणी दौरे झाल्यानंतरदेखील त्याबाबत निश्चित निर्णय झाला नसल्याची माहिती पुढे आली आहे.

बांधण्यात येणारे पूल

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (डीएफसी) प्रकल्पांतर्गत सफाळे (कपासे), पालघर चार रस्ता- गोठणपूर तसेच उमरोळी पूर्व- पश्चिम भागातील पुलांचा समावेश आहे. या प्रत्येक पुलाला सुमारे पन्नास कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दहा पुलांची उभारणी होत आहे. त्यामध्ये शिलोत्तर (वसई) (९३.५५ कोटी), जुचंद्र- बापाने (२८२.६१ कोटी), सफाळे- मांडे-टेंभीखोडावे (६५.९२ कोटी), पालघर-नवली (८६.३० कोटी), कोळगाव- नंडोरे (९६.६२ कोटी), बोईसर- वंजारवाडी (११३.९८ कोटी), वाणगाव (१०३.२४ कोटी), घोलवड चिखले- चिंबावे (८०.१० कोटी), घोलवड कंकराडी कोसबाड-मल्याण (६३७.६४ कोटी), उंबरगाव बोर्डी फाटा-  तलासरी (८२.१९ कोटी) या पुलांचा समावेश आहे.