|| प्रशांत देशमुख 

आयुर्वेद व अन्य भारतीय चिकित्सा शैक्षणिक संस्थांना निर्देश

वर्धा : आयुर्वेद व अन्य भारतीय चिकित्सा प्रणालीच्या शैक्षणिक संस्थांनी पूर्णपणे कोविडविषयक संशोधन कार्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना आयुष मंत्रालयाकडून आली आहे. आयुर्वेद, युनानी, सिद्ध व तत्सम भारतीय उपचार पद्धतीचे नियमन करणारी देशातील सर्वोच्च संस्था असणाऱ्या भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने कोविड अनुषंगिक विशेष बैठकीत काही निर्णय घेतले व आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अध्यापन, रुग्णालय सेवा व जनजागृतीपर उपक्रमाबाबत चिकित्सा परिषदेने सर्व आयुर्वेदिक व तत्सम संस्थांसाठी सूचना केल्या आहेत. त्यानुसार, भारतीय उपचार प्रणालीच्या महाविद्यालयात ऑनलाईन माध्यमातून अध्यापन करण्याची अपेक्षा ठेवतानाच त्याचा कार्यक्रम सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पदव्युत्तर पातळीवर शोधप्रबंधपर तसेच संशोधन पातळीवर कोविड महामारीवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याची सूचना आहे. आयुर्वेद व योगा शाखेने रुग्णालय व्यवस्थापन पातळीवर गृह विलगीकरणासाठी आवश्यक ती पावले टाकावी, राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या अनुषंगाने कोविड रुग्णावरील उपचारासाठी एकात्मिक भूमिका ठेवावी, केंद्र किंवा राज्य शासनाने या शाखेचे महाविद्यालय किंवा रुग्णालय अधिग्रहित केले असतील तर त्याचा अहवाल चिकित्सा परिषदेकडे दर सोमवारी सादर करावा, कोविडची परिस्थिती पाहून महाविद्यालयातर्फे  ऑनलाईन मार्गदर्शन तसेच बाह्य रुग्ण विभाग सुरू केले जाऊ शकतात, टेली मेडिसीनबाबत आयुषतर्फे  सुधारित मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली जातील. भारतीय चिकित्सेच्या सर्व महाविद्यालयांनी जिल्हा किंवा स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, महाविद्यालयाच्या रुग्णालयात कोविड काळजी केंद्र तसेच कोविड आरोग्य केंद्र स्थापन करण्याबाबत प्रशासनाशी समन्वय साधावा, स्थानिक प्रशासनाच्या रितसर परवानगीने ही महाविद्यालये लसीकरण कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. भारतीय चिकित्सेच्या महाविद्यालयांनी त्यांची सर्व संसाधने कोविडविषयक जनजागृती करण्यासाठी उपयोगात आणावे, महाविद्यालयांनी समुपदेशक किंवा मानसिक रोग तज्ज्ञांची सेवा घेऊन परिसरातील लोकांचे समुपदेशन करावे, अशीही सूचना आहे.

चिकित्सा परिषदेची ही भूमिका स्वागतार्ह  आहे. कोविड संक्रमण काळात नवनवी आव्हाने उभी होत आहेत. म्हणून पारंपरिक भारतीय औषधप्रणालीची मदत प्रासंगिक ठरते. महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाप्रमाणे अन्य महाविद्यालयांनी कोविड काळजी केंद्रासाठी पुढाकार घेतल्यास व त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास आव्हानांचा सामना सहज होऊ शकेल. – डॉ. श्याम भूतडा, माजी अधिष्ठाता, मेघे अभिमत विद्यापीठ.