मरणपंथाला लागलेल्या पशुधनाच्या जतनासाठी गांधीवाद्यांचा पुढाकार

प्रशांत देशमुख, वर्धा</strong>

दुष्काळाच्या भीषण संकटाचा सामना करणाऱ्या शासनास त्याच्या कामात आपणही हातभार लावावा, या हेतूने मरणवाटेला लागलेल्या पशुधनाचे जतन करण्यासाठी ज्येष्ठ गांधीवादी पुढे आले असून उत्तर महाराष्ट्रात चारा छावण्या सुरू करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे.

महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या अखिल भारत कृषी गोसेवा संघाने हा पुढाकार घेतला आहे. गाजावाजा न करता नाशिक जिल्हय़ातील मालेगावला महावीर जयंतीस छावणी सुरू करण्यात आली. निसर्गचक्र अबाधित राखण्यासाठी पशुधनाचा सांभाळ व संवर्धन करणे गरजेचे आहे, असा हेतू ठेवून गांधीजींनी स्थापन केलेल्या या संस्थेची दुष्काळच्या पाश्र्वभूमीवर खरी गरज असल्याचे गांधीवाद्यांना वाटते. मालेगाव तालुक्यातील मांजरे गावी ५०० गुरांची सोय करण्यात आली आहे. परिसरातील अंधारवाडे, सावकारवाडी, शिरकौडी, टाकळी व सोहज येथील शेतकऱ्यांचे पशुधन आश्रयास आहे. अशीच छावणी तालुक्यातील दक्षिण भाग, माळ माथा परिसरात सुरू करण्याची तयारी आहे.

या चारा छावण्याच आज परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा देत आहे. दोन हजार संख्येपर्यंत गुरांचा सांभाळ करण्याची त्यांची क्षमता आहे. चारा संस्थेतर्फे  पुरवण्यात येतो. शासनाने पाणीपुरवठा करण्याचे मान्य केले आहे, पण आपात्कालीन व्यवस्थाही आहे. सावलीसाठी हिरवी जाळी अंथरण्याचे काम पूर्णत्वास आल्याचे कार्याध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांनी सांगितले. गव्हाणीसाठी टाक्यात बांबूची व्यवस्था आहे. परिश्रम करण्याची तयारी होती. उद्दिष्ट पक्के होते. शासनाकडून अपेक्षा ठेवायची नव्हती. गोसेवा संघाला मुंबईच्या वर्धमान परिवाराने, ग्राम स्वराज्य समिती व ध्यान फाऊंडेशनने निधी दिला.

मालेगावसोबतच बीड व सातारा जिल्हय़ात डॉ. शिवप्रसाद चरखा यांनी गोसेवा संघाच्या मार्गदर्शनात छावण्या उभारल्या आहेत. प्रथम मालेगावच कां, या प्रश्नावर डॉ. बरंठ म्हणाले की, या भागातील शेतकऱ्यांनी स्वत:  मागणी केली होती. १९७२ पेक्षाही भयावह दुष्काळ अनुभवत असल्याचे शेतकरी म्हणाले. शासनाचे प्रयत्न सुरू आहे, पण गोसेवा संघाचीही मदत हवीच, असे त्यांचे म्हणणे होते. म्हणून त्या गावाला  प्राधान्य दिले.

दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील मागणी असलेल्या ग्रामीण भागात छावण्या उभारण्याची तयारी गोसेवा संघाने ठेवली आहे. २५ एप्रिलला संस्थेच्या गोपूरीतील कार्यालयात होणाऱ्या बैठकीत विदर्भातील गावांचा आढावा घेतला जाणार आहे. चारा व अन्य सुविधांबाबत पुरेसा निधी स्वयंसेवी संस्थांकडून उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आले.