गेल्या दोन-तीन दिवसांपासून बेमोसमी पावसाचा व थंडी गायब झाल्याचा अनुभव घेताना शुक्रवारी पहाटे मात्र अवघे सोलापूर शहर धुक्यात हरविल्याचे चित्र पाहावयास मिळाले. धुके व गुलाबी थंडीचा अनुभव सोलापूरकरांना सहसा मिळत नाही. या पार्श्र्वभूमीवर पहाटे धुक्याचे व गुलाबी थंडीचे वातावरण अनुभवण्यासाठी सोलापूरकर मोठय़ा संख्येने घराबाहेर पडले होते.
गेल्या आठवडय़ापासून शहर व परिसरात हवामानात बदल होत आहे. आठवडय़ापूर्वी हिवाळ्याची तीव्रता वाढून थंडीचे प्रमाण चांगलेच वाढले होते. तापमान १२ अंशाच्या खाली आले असताना थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता. त्यानंतर अचानकपणे हवामानात बदल होऊन बेमोसमी पावसाच्या सरी कोसळल्या. दोन तीन दिवस पावसाच्या सरी कोसळत असताना थंडीचे प्रमाण घटत तापमान १२ अंशावरून २० अंशापर्यंत वाढत गेल्याचे दिसून आले. थंडी गायब होऊन उकाडा जाणवत असताना सूर्यदर्शनही झाले नव्हते. ढगाळ वातावरण असतानाच शुक्रवारी पहाटे अचानकपणे वातावरणात धुके पसरले. पाठोपाठ गुलाबी थंडीही जाणवत गेली. पहाटे धुके इतके वाढले होते की रस्त्यावरून फेरफटका मारताना समोरील दोन फुटाच्या अंतरावरचेही काही दिसत नव्हते. सकाळी उशिरापर्यंत ही स्थिती होती. त्याचा परिणाम रस्ता वाहतुकीवर झाला. तसेच रेल्वे वाहतुकीवर धुक्याचा परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. मुंबई-सोलापूर सिध्देश्वर एक्स्प्रेसला सकाळी सोलापुरात पोहोचण्यास दीड तास विलंब झाला तर सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसलाही पुण्यात पोहोचण्यास उशीर झाला.