राष्ट्रपतींकडून होणार गौरव, पेटंटही मिळणार

नगर : केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, तसेच नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीतील आयआयटी येथे आयोजित केलेल्या ७ व्या राष्ट्रीय पातळीवरील इन्स्पायर अ‍ॅवॉर्डसाठी नगर शहरातील विद्यार्थी आशिष अजय राऊत याची अंतिम साठ संकल्पनांमध्ये निवड झाली आहे. त्याने बनवलेल्या ‘फोल्डिंग टॉयलेट’ या उपकरणाला महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळाला होता. त्याचा लवकरच राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनमध्ये सन्मान केला जाणार आहे, तसेच त्याच्या उपकरणाची जपानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय इनोव्हेशन कॉन्फरन्ससाठी निवड करण्यात आली आहे.

आशिष राऊत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे, तर सध्या तो हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयात अकरावी शास्त्रमध्ये शिकत आहे. राष्ट्रीय पातळीवरील इनस्पायर अ‍ॅवॉर्ड प्रदर्शन नवी दिल्लीत १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात भारतातील विविध राज्यांमधील निवडक ८५० उपकरणांचा सहभाग नोंदवण्यात आला. जिल्हा, राज्य अशा पातळीवरून स्पर्धातून या उपकरणांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातील एकूण ६५ उपकरणांनी सहभाग नोंदवला.

राष्ट्रीय प्रदर्शनात नगर शहरातील विद्यार्थी आशिष राऊतने तयार केलेल्या ‘फोल्डिंग टॉयलेट’  ह्या आगळ्यावेगळ्या उपकरणाला देशभरातून निवडण्यात येणाऱ्या अंतिम ६० संकल्पनांमध्ये निवड झाल्याचा बहुमान मिळाला. त्याबद्दल त्याचा नवी दिल्लीतील समारंभात विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला व इनस्पायर अ‍ॅवॉर्ड प्रदान करण्यात आले. आता त्याचा लवकरच राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येणार असून त्याच्या फोल्डिंग टॉयलेट या उपकरणाचे प्रदर्शनही केले जाणार आहे. त्याची

निवड जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठीही झाली आहे. काहीच दिवसात त्याला केंद्र सरकारकडून त्याच्या उपकरणासाठी पेटंटही मिळणार आहे.