जिल्ह्य़ातील विकासाचे प्रलंबित प्रश्न शासन स्तरावरून सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्ह्य़ाचे पालक सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात टंचाई परिस्थिती व विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
सहकार राज्यमंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी खा. डॉ. सुभाष भामरे, खा. डॉ. हीना गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा सरला पाटील, आदी उपस्थित होते. बैठकीत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या समवेत धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे स्थलांतर, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर, धुळे जिल्ह्य़ातील तहसील कार्यालय, नवोदय विद्यालय, आदिवासी व समाजकल्याणच्या वसतिगृहांना जागा उपलब्ध होणे, महानगरपालिकेची आर्थिक स्थिती व विकासकामांसाठी मदत, नागपूर-अमरावती-सुरत महामार्गाचे चौपदरीकरण, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र धुळे येथे सुरू करणे, धुळे जिल्ह्य़ातील मध्यवर्ती सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, या विषयांवर चर्चा करण्यात आली. भुसे यांनीही जिल्ह्य़ातील प्रलंबित विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी धुळे जिल्हा, खरीप पीक पेरणी, पर्जन्यमान, टंचाई, नैसर्गिक आपत्ती, अनुदान वाटप, हंगामी पैसेवारी खरीप २०१५, जलयुक्त शिवार अभियान, पुनर्वसन, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, खरीप पीक कर्जवाटप, जन-धन योजना व प्रधानमंत्री विमा योजना, आधार नोंदणी, महाराजस्व अभियान यासह जिल्ह्य़ातील अपूर्ण विकास कामांची माहिती दिली.