पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात प्रसादाच्या भोजनातून गावातील सुमारे ३०० लोकांना आज पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले, असे अधीक्षक डॉ. पंकज गायकवाड यांनी सांगितले.
आंबे येथील दर्लिग देवस्थान प्रसिद्ध असून देवास बोललेला नवस फेडण्यासाठी येथे अनेक जण येत असतात. ५ रोजी वालघ हा देवाचा (गावातील सर्वाचा) जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. गावातील सर्वाना प्रसादासाठी आमंत्रित केले जाते. या दिवशी संध्याकाळी शेकडो लोकांनी प्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर रात्रीपासून यातील काही जणांना डोके गरगरणे, ताप येणे, उलटय़ा होणे, जुलाब होणे सुरू झाले. ज्यांना हा त्रास जाणवत होता त्यांना गावातच उपचार केले. मध्यरात्रीनंतर अनेकांना वरीलप्रमाणे त्रास सुरू झाला आणि सकाळी १२ वाजता यातील प्रथम ९५ लोकांना उपचारासाठी दाखल केले. या लोकांवर उपचार चालू असतानाच ३० जणांना उपचारासाठी दाखल केल्याने उपजिल्हा रुग्णालय रुग्णांनी गच्च भरल्याने रुग्णालयात रुग्ण ठेवण्यास व पाय ठेवण्यासही जागा नव्हती. या सर्वावर डॉ. पंकज गायकवाड व त्यांचे १५ डॉक्टर सहकारी, ३५ नर्सेस यांनी तातडीने उपचार चालू केले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.
ही घटना समजताच प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार गजानन गुरव यांनी रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. डॉक्टरांशी चौकशी करून आंबे येथील प्रत्येक घरात जाऊन कोणाला याचा त्रास आहे का, याबाबत तपासण्यासाठी ग्रामीणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बोधले यांच्यासह १० जणांच्या चमूने सुरुवात केली आहे व उपजिल्हा रुग्णालयात जागा नसल्याने गावातच रुग्णांवर उपचाराची या वैद्यकीय पथकाने सोय केली आहे. ग्रामीण भागात सध्या यात्रांचा हंगाम चालू असून अन्नातून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विषबाधा होण्याची ही पहिलीच घटना आहे.
एवढय़ा मोठय़ा लोकांना विषबाधा झाल्याचे समजताच रुग्णालयात जाऊन विठ्ठल सहकारीचे संचालक भगीरथ भालके, माजी आमदार सुधाकर परिचारक, आमदार लक्ष्मण ढोबळे यांनी रुग्णांची विचारपूस केली तर आमदार भारत भालके हे परगावी असल्याने त्यांनीही हे वृत्त कळताच वैद्यकीय अधिकाऱ्याकडे रुग्णांच्या प्रकृतीबाबत चौकशी करून उपचाराबाबत योग्य त्या सूचना दिल्या. रुग्णांची प्रकृती बरी असून सर्वावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.