मुलाचे लग्न ठरल्याने सोयरीक जमवण्यासाठी आलेल्या ५० पाहुण्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना नांदेडच्या किनवट तालुक्यात असलेल्या सावरगाव तांडा या ठिकाणी घडली. विषबाधा झालेल्या लोकांना जवळच्याच जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती गंभीर आहे असे कळल्याने त्यांना किनवट येथील उप जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले आहे.

किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा या ठिकाणी जवाहर पडवळे यांच्या मुलाच्या सोयरीकीच्या निमित्ताने तेलंगणातील आदिलाबादच्या राहणपूर भागातून साधारण २५ ते ३० पाहुणे आले होते. सावरगाव या ठिकाणी हा कार्यक्रम झाल्यानंतर पाहुण्यांना वरण-भात आणि भाजी पोळी असे जेवण देण्यात आले. वांगे आणि बटाटाच्या भाजीत पाल कधी पडली ते कोणालाही समजले नाही. जेवणाची वेळ झाल्यानंतर सगळेच जेवायला बसले तेव्हा जेवताना काही लोकांना जेवणात पालीची शेपटी, धड आणि डोके आढळले. याबाबत सावध करेपर्यंत अनेक लोकांना उलट्या, मळमळ असा त्रास होऊ लागला होता. त्यांना तातडीने जलधारा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्या रूग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत कोणाच्याही जिवाला धोका नाही असे समजते आहे.