शासनाच्या आधारभूत केंद्रावर धानाची खरेदी करण्याबरोबरच शेतकऱ्यांना बोनसचे वाटप करताना सुमारे शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला. विधिमंडळात याला वाचा फोडल्यानंतर त्रिसदस्यीय समितीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गतवर्षीच्या खरीप हंगामानंतर जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर जवळपास ६ लाख ६० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. तथापि, शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनीच अधिक धान या केंद्रावर विक्री केल्याचा आरोप त्यांनी केला. भंडारा मोहाडी आणि तुमसर या तीन तालुक्यातील बहुतेक आधारभूत केंद्रावर व्यापाऱ्यांनी धानाची विक्री केली असून, त्यात वरठी येथील एका बडय़ा व्यापाऱ्याकडील धानाचे प्रमाण अधिक आहे. या व्यापाऱ्याच्या कुटुंबातील १० सदस्यांकडे एकूण ५४ एकर शेती असून, तब्बल अडीच लाख िक्वटल धान केंद्रावर विक्री झाल्याचे दाखविण्यात आले. एकरी १० क्विंटलचे उत्पादन गृहीत धरल्यास ५४० क्विंटल धान होते. अशा स्थितीत एकाच कुटुंबाने अडीच लाख क्विंटल धान कसे आणले? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.
हा विषय विधिमंडळात उपस्थित केल्यानंतर शासनाने दखल घेतली असून भंडारा, गोंदिया व गडचिरोली येथील प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी केली जात आहे. यावर्षी निसर्ग कोपला असून, नसíगक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
विदर्भ आणि कोकणातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे अत्याधिक नुकसान होत असताना, धानाला बोनसची मागणी पुढे येत आहे. मात्र,बोनसचे वाटप करताना काही मोजक्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळतो आणि व्यापारी गरमार्गाने फायदा लाटतात. परिणामी, सातबारा उता-यावरील नोंदीनुसार बोनसचा लाभ देण्याची मागणी शासनाकडे केल्याचेही आमदार वाघमारे यांनी सांगितले.