पेण येथे कोकण विभागीय कृषी फलोत्पादन परिषद संपन्न

वाढत्या लोकसंख्येचा परिणाम शेतीवर होत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत शेतीचे उत्पादन घटते आहे. अशा परिस्थितीत हा समतोल साधायचा असेल तर शेतीचे उत्पन्न वाढवले पाहिजे, त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे मत कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघातर्फे पेण येथील गिरीराज फार्म येथे कोकण विभागीय कृषी फलोत्पादन परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेचे उद्घाटन तानाजी सत्रे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कोकणात शेतीचे उत्पादन घेताना येथील

शेतकऱ्यांनी आंब्यावरच अवलंबून राहता कामा नये. रबर किंवा पामची लागवडही कोकणात यशस्वीरीत्या होऊ शकते, हे कोकण कृषी विद्यापीठाने सिद्ध करून दाखवलंय. देशाच्या विकासासाठी उद्योग जरी हवे असले तरी शेतीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. उद्योगांमुळे पर्यावरणाची हानी होते. उलट शेतीमुळे पर्यावरण संवर्धनास मदत होते, असे सत्रे म्हणाले.

कोकणात अन्य भागांच्या तुलनेत अधिक पाऊस होत असला तरी नियोजनाचा अभाव दिसतो. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र खूपच कमी आहे. कोकण पट्टय़ातील ३१ लाख हेक्टर क्षेत्रांपकी केवळ ८ ते ८.२५ लाख हेक्टर क्षेत्रच लागवडीखाली आहे. हे क्षेत्र वाढण्याची गरज असल्याचे मत तानाजी सत्रे यांनी व्यक्त केले.

या परिषदेत ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी शेतकऱ्यांना हवामान अंदाज आणि बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यावर मार्गदर्शन केले. यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होणार आहे, असा जो अंदाज बांधला जात आहे, त्याची कारणमीमांसा केली. एकूणच हवेचा दाब पाहिला तर पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवर हवेचा दाब कमी आहे. त्यामुळे मान्सूनचा प्रस्ताव तयार झाला आहे. वारे विषुववृत्ताच्या दक्षिणेकडून ५ अक्षांशावरून उत्तरेकडे वाहायला लागतात. ते सोबत मोठय़ा प्रमाणावर बाष्प घेऊन येतात. त्याचे रूपांतर ढगात होते. जेथे हवेचा दाब कमी असेल तेथे पाऊस पडतो. यावर्षी तापमान असल्याने पावसासाठी पूरक वातावरण तयार झाले असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.

आमदार धर्यशील पाटील, रायगडच्या जिल्हााधिकारी शीतल तेली उगले, बावसकर टेक्नॉलॉजीचे डॉ. विनायक बावसकर, सुप्रसिद्ध भातशास्त्रज्ञ डॉ. विजय देशपांडे, सगुणा बागेचे संचालक शेखर भडसावळे यांनीही या वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या परिषदेत शेतीचे नवीन तंत्रज्ञान, बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, उत्पन्नवाढीसाठी करायच्या उपाययोजना यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले. या ठिकाणी शेतीतील नवीन अवजारे प्रदर्शनात मांडण्यात आली होती. त्यांची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट  कामगिरी करून भरघोस उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी साकव संस्थेचे अरुण शिवकर, बोर्झे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि संकल्प ग्रामसमृद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी बाळासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.