वसई-विरारमध्ये नफेखोरांचा बाजार; खासगी निदान केंद्रांतून खुलेआम विक्री

विरार : वसई-विरार शहरात नफेखोरांनी बाजार मांडला आहे. शहरात मृत्यूचे तांडव माजले असताना रेमडेसिविर, प्राणवायू, पीपीई किट, र्निजतुक द्रव याचबरोबर आता प्लाझ्मा (रक्तद्रव) चा काळाबाजार सुरू आहे. खासगी निदान केंद्रात खुलेआम दाम दुप्पट करून रक्तद्रव विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याबाबत स्थानिक प्रशासन पूर्णत: अनभिज्ञ आहे.

वसई-विरारमध्ये मागील दोन मार्च महिन्यापासून करोनाग्रस्त रुग्णांची स्थिती गंभीर होण्याचे प्रकार झपाटय़ाने वाढत आहेत. रेमडेसिविर आणि प्राणवायूचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्ण अधिकच गंभीर होत आहेत. या वेळी खासगी रुग्णालये रुग्णांच्या उपचारासाठी नातेवाईकांना रक्तद्रव आणण्यासाठी सक्ती करत आहेत. करोना रुग्णावर उपचार करण्यासाठी करोनामुक्त झालेल्या रुग्णांचा रक्तद्रव साठा आवश्यक असतो. पण मागील चार महिन्यांपासून एकही दाता पुढे न आल्याने मान्यताप्राप्त रक्तपेढीत रक्तद्रवाचा ठणठणणाट असताना काळ्या बाजारात मात्र रक्तद्रव खुलेआम विकले जात आहे. विशेष म्हणजे रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रक्तद्रवाची कोणतीही गुणवत्तेची कोणतीही शाश्वती नसताना रुग्णांना दिले जाणारे रक्तद्रव यामुळे रुग्णांच्या जिवांना धोका निर्माण झाला आहे.

वसईत रेमेडीसीवीरचा मोठा तुटवडा असल्याने खासगी रुग्णालये रुग्णांना रक्तद्रवची मागणी करत आहेत. नालासोपारा येथील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या स्वामी तुकाराम लोखंडे यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी रुग्णालयातून रक्तद्रवाची आवश्यकता असल्याचे लिहून दिले. या वेळी हे रक्त द्रव्य कुठून उपलब्ध होईल असे विचारले असता रुग्णालयातून नालासोपारा विजय नगर नगर येथील श्री डायग्नोस्टिक सेंटरमधून उपलब्ध होईल असे सांगितले. त्यांनी या ठिकाणी चौकशी केली असता त्यांना १२ हजार रुपये सांगितले. पण तडजोडी नंतर त्यांना १० हजार रुपयांत एक रक्तद्रवाची पिशवी देण्यात आली. याची कोणतेही देयक त्यांना देण्यात आले नाही. तर इतर दोन पिशव्या त्यांनी मीरारोड आणि जोगेश्वरी परिसरातून उपलब्ध केल्या. स्वामी यांचा रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांनी रुग्णालयाचे नाव न देण्याची विनंती केली. अशा पद्धतीने खुलेआम रक्तद्रवाचा काळाबाजार आता वसईतफोफावत आहे.

‘प्लाझ्मा हेल्प डेस्क’ची मागणी

नालासोपारा येथे सरला रक्तपेढी ही अधिकृत एकमेव रक्तद्रव पुरवठा करणारी संस्था आहे. याशिवाय कुणालाही शहरात परवानगी नाही. या रक्त पेढीचे संचालक विजय महाजन यांनी माहिती दिली की, अशा पद्धतीने जर रक्तद्रवाचा व्यापार होत असेल तर चुकीचे आहे मुळात रक्तद्रवाची किंमत ५ हजार रुपये आहे. पण सध्या रक्तदाते नसल्याने आम्हाला पुरवठा करणे कठीण आहे. पालिकेने पुढाकर घेऊन ‘प्लाज्मा हेल्प डेस्क’ची निर्मिती करावी यामुळे या काळ्याबाजाराला आळा घालता येयील. तर पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश चौहान यांनी याबाबत अशा चाचणी केंद्रावर कारवाई केली जाईल असे सांगितले.