उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले; उत्तर महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
उद्योगपतींनी कर्ज बुडविल्यास त्यांना कर्ज माफ होते. परंतु, शेतकऱ्यांचे कर्ज माफ का होत नाही, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केला. वर्षभरात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झालेले नाहीत. आम्हांला विरोधक समजत असलात तर शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही विरोधक आहोत, असेही त्यांनी भाजपचे थेट नाव न घेता सुनावले.
उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना आर्थिक मदत करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी शनिवारपासून दौरा करत आहेत. रविवारी येथील सागर पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. या सभेत खानदेशातील २२३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत करण्यात आली. सभेत ठाकरे यांनी प्रामुख्याने भाजप आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले.
खानदेशात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मराठवाडय़ात शाळेच्या पाससाठी पैसे नसल्यामुळे विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागली. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिवसेना जनतेच्या पाठीशी आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले.
दुष्काळग्रस्त भागांची पाहणी सेनेच्या आमदारांनी केली असून त्याचा अहवाल माझ्याकडे सादर केला आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार असून यावर काय उपाय करता येतील, यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे. केवळ आढावा न घेता प्रत्यक्षात काय मदत मिळाली याची पाहणी दोन महिन्यांनंतर करण्यात येईल. आम्हाला शेतातील काही कळत नसले तरी चालेल परंतु, शेतकऱ्यांचे अश्रू आम्ही पुसणार आहोत. केळी पिकाला फळाचा दर्जा मिळावा यासह केळीचा शालेय पोषण आहारात समावेश केला जावा. स्मार्ट सिटी करण्यापेक्षा ग्रामीण भागातील अन्नपाण्याचा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना वाढीव वीज देयके येतात, अशी व्यथाही ठाकरे यांनी मांडली.
एकनाथ खडसेंवर टीका
जिल्ह्य़ात महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षांवरही ठाकरे यांनी खास आपल्या शैलीत ‘गुलाबाला काटे असतात. गुलाबारावांच्या खरं बोलण्याने कुणाला काटे टोचत असतील तर आम्ही काय करणार’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेचा जो मंत्री, आमदार जनतेसाठी वेळ देणार नाही, ते सेनेत राहणार नाहीत. मंत्री लोकांच्या घरी जातील व समस्या सोडवतील. गुलाबराव पाटील कितीही केसेस झाल्या तरी घाबरू नका, अशी टोलेबाजीही ठाकरे यांनी केली. यावेळी गुलाबरावांनीही खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडत आम्ही शेतकऱ्यांसाठीच जगणार, असे नमूद केले.