राज्यात आमचं सरकार आलं तर पहिल्यांदा राज्यात नव्या उद्योगांमध्ये भुमिपुत्रांना ७५ टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याचा कायदा करणार, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, राज्यात नवे उद्योग स्थापण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, मात्र, त्यामध्ये भुमिपुत्रांना ७५ टक्के नोकऱ्या या मिळायलाच हव्यात उर्वरित २५ टक्के नोकऱ्या बाहेरच्या लोकांना देण्यास हरकत नाही. मात्र, याची अंमलबजावणी झाली नाही तर असे उद्योग बंद होतील, असा कायदा आम्ही करणार आहोत. त्यामुळे स्थानिकांना नोकऱ्यांची हमी मिळेल.

शेतकऱ्यांच्या पीकविम्यासाठी मुंबईतल्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये शिवसेनेने काढलेल्या मोर्चावरही यावेळी अजित पवारांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, तुम्ही सरकारमध्ये आहात केंद्रात आणि राज्यात तुमचे मंत्री असताना अधिकाऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्याचे आदेश द्यायचे सोडून मोर्चे कसले काढता, तुम्ही रडीचा डाव खेळत आहात आणि जनतेची निव्वळ फसवणूक करीत आहात. शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या विम्याचे पैसे मिळावेत म्हणून रब्बी पिकांच्या विमा कंपन्यांवर मोर्चा काढत आहात. रब्बी आणि खरीप यातला फरकच त्यांना कळत नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ही लोक काही कामाची नाहीत, ते केवळ शिवाजी महाराजांचे नाव घेऊ तरुणांची माथी भडकवायची कामं करताहेत. समाजा-समाजात दुही माजवाचे काम करताहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, मराठवाड्यातील पाणीप्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, इथल्या धरणांमध्ये सध्या मायनसमध्ये पाण्याची पातळी गेली आहे. मराठवाड्यात पिकांची अवस्था वाईट आहे, कारखान्यांची पार वाट लागली आहे. देशभरात अनेक मोठ्या कंपन्या बंद पडल्या तरी सरकार काही करत नाही. सरकारने गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांची आणि महाराष्ट्राची निव्वळ फसवेगिरी केली. मराठवाड्याकडे या सरकारचे अजिबात लक्ष नाही. विदर्भाला मात्र भरभरुन दिले जात आहे तो ही महाराष्ट्राचाच भाग असला तरी मराठवाडाही आपलंच भावंड आहे, हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे. पैठणच्या जगप्रसिद्ध पैठणी साडीवर सरकारने जबरदस्त जीएसटी लावला आहे त्यामुळे हे काम करणारे अनेक उद्योग बंद पडलेत, अनेकांचा रोजगार गेला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

“राष्ट्रवादी काँग्रेसमधून जे लोक भाजपामध्ये गेले आहेत त्यांना जाऊ द्या, त्यांच्याशिवाय आपले काहीही अडत नाही. त्यांच्याशिवाय आपण पुढे जाऊ, आम्ही आता राज्यातील सर्वच भागातील तरुणांना ताकद देऊन नव्या चेहऱ्यांना पुढे आणणार आहोत, त्यासाठी सज्ज रहा. आम्ही तुमच्या मनातील उमेदवार देऊ,” अशी ग्वाही यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आणि मतदारांना दिली.

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर अण्णा हजारे गप्प का?

आमच्या सरकारच्या काळात माहिती अधिकार कायदा केला गेला. त्या काळात मोठ-मोठ्या लोकांनी त्यासाठी आंदोलने केली. मात्र, आता केंद्र सरकारकडून या माहिती अधिकार कायद्याला नख लावले जात असताना ते गप्प का आहेत? याबाबत मला अण्णा हजारेंना प्रश्न विचारायचा आहे, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.