‘महाऑरेंज’ला केंद्राचा निर्यात परवाना
अनोख्या चवीने जगप्रसिध्द व बहुगुणी समजल्या जाणाऱ्या विदर्भातील संत्र्याचा विजनवास संपविण्यास आता केंद्राने पुढाकार घेतला आहे. आखाती व अन्य देशातील बाजारपेठेसाठी संत्र्यांच्या निर्यातीस केंद्राने परवानगी दिली आहे.
देशातील ७० टक्के संत्रा उत्पादन करणाऱ्या अमरावती व वर्धा जिल्ह्य़ातील कारंजा व नागपूर जिल्ह्य़ांच्या काही परिसरातील संत्रा उत्पादकांना या पिकाने सुगीचे दिवस आणले नाहीत. देशविदेशात मागणी असणाऱ्या या बहुगुणी फ ळाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता हे दिवस बदलण्याची आशा बळावली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेने कारंजा येथील संत्रा निर्यात केंद्र कृषी पणन मंडळाने आता ‘महाऑरेंज’ला हस्तांतरित केले आहे. लगोलग महाऑरेंजला संत्रा निर्यातीचा परवानाही केंद्राने बहाल केला. या निर्यात केंद्रात संत्रा मंडी भरविली जाईल. देशभरातील संत्रा व्यापाऱ्यांना तेथे निमंत्रित करतांनाच योग्य भाव मिळेल, याची ग्वाही महाऑरेंजचे अध्यक्ष अनंत घारड यांनी दिली. मान्यवरांच्या उपस्थितीत कारंजा येथे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची चर्चा झाली. आयात-निर्यातविषयक धोरण आखणारी सर्वोच्च संस्था ‘अपेडा’चे महाव्यस्थापक तरुण बजाज, व्यवस्थापक वनिता सुधांशू, कृषी पणन मंडळाचे संचालक मिलिंद आकरे, कृषी समृध्दीचे संचालक रवींद्र ठाकरे, महाऑरेंजचे श्रीधर ठाकरे, निर्यातदार अक्रमभाई हे या चर्चेत सहभागी होते.
आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी यावेळी स्पष्ट केले की, विक्रेता शेतकरी व खरेदीवर व्यापारी यांच्यात भावाची घसरण टळावी म्हणून समन्वय साधणे गरजेचे आहे. शासकीय पातळीवर हे फ ळ दुर्लक्षितच राहिले. हे फ ळ विदर्भाची ओळख आहे म्हणून तर सापत्नभाव नाही ना, असा प्रश्नच आमदार बोंडे यांनी उपस्थित करून अधिकाऱ्यांना पेचात पकडले. भौगोलिक निर्देशांक (जीआय) प्राप्त विदर्भाच्या संत्र्याला जगप्रसिध्द म्हटले जाते, पण आयात-निर्यातविषयक धोरण असणाऱ्या अपेडाच्या यादीवर संत्रा हे फ ळच नाही. काही प्रमाणात बांगलादेशात संत्रा अनधिकृतपणे पोहोचतो. आता अपेडाने हे फ ळ गडकरी यांच्या सूचनेने निर्यात फ ळांच्या यादीवर घेतले आहे.
हैदराबादला छोटय़ा, तर मुंबईला मोठय़ा आकाराच्या संत्र्यांची मागणी असते. दिल्लीत नारिंगी रंचाचाच संत्रा खपतो. हीच बाब वेगवेगळ्या देशांना लागू पडू शकते. या पाश्र्वभूमीवर सक्षम संत्रा बागाईतदार अपेक्षित तो संत्रा पिकवून देऊ शकतो, अशी खात्री उत्पादकोंतर्फे श्रीधर ठाकरे यांनी दिली. संत्रा हे फ ळ शासनाच्या लेखी दुय्यम ठरल्यानेच उत्पादक पिचले गेले.

दुबईकडे लक्ष
सध्या पाकिस्तानातून दुबईत ज्या भावाने संत्रा जातो तो जरी मिळाला तरी पुरेसे आहे. निर्यातीच्या बाबी अंमलात त्वरित आणा, असा आग्रह संत्रा उत्पादकांकडून होत आहे. अपेडाने पुरेशी तत्परता दाखविली तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात वैदर्भीय संत्री दुबईच्या बाजारपेठेत दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.