News Flash

परदेशी नागरिक लसीकरणापासून वंचित

सध्या शासनाची लसीकरण मोहीम जलद गतीने सुरू आहे.

प्रसेनजीत इंगळे

नायजेरिया आणि नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका येथील नागरिकांचा समावेश

विरार :  सध्या शासनाची लसीकरण मोहीम जलद गतीने सुरू आहे. पण या मोहिमेत परदेशी नागरिकांचा समावेश होताना दिसत नसल्याने हे नागरिक लसीकरण प्रक्रियेतून वंचित राहणार की काय, अशी भीती आता निर्माण झाली आहे. यामुळे पालिकेने या नागरिकांच्या लसीकरणाचा विचार करावा अशी मागणी जोर धरत आहे.

वसई-विरार परिसरांत मागील महिन्यापासून करोना महामारीने उच्चांक गाठला आहे. त्यात करोनाबाधितांची वाढती संख्या आणि वाढते मृत्यूचे प्रमाण पाहाता पालिकेने संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती दिली आहे. यामुळे शहरात लसीकरण केंद्रांचे जाळे उभारले जात आहे. असे असताना यात स्थानिकांचा विचार प्रथम केला जात असला तरी परदेशी नागरिकांचा विचार होणे गरजेचे आहे. सध्या टाळेबंदीमुळे अनेक परदेशी नागरिक देशाच्या विविध भागांत अडकले आहेत. काही शिक्षणासाठी, नोकरीसाठी तर इतर काही कामासाठी आले असताना विमानसेवा बंद असल्याने आपल्या देशात परत जाऊ शकलेले नाहीत. अशा लोकांच्या लसीकरणाचे काय, याचे उत्तर अजूनही पालिकेकडे नाही आहे.

वसई-विरार परिसरांत नायजेरिया आणि नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या देशांतून हजारो नागरिक विविध ठिकाणी वावरत आहेत. एकटय़ा नालासोपारा शहरात ४ हजारांहून अधिक नायजेरियन नागरिक राहात आहेत. अनेक नागरिक बेकायदासुद्धा राहात आहेत.

विशेष बाब म्हणजे मागील वर्षांच्या करोनाकाळापासून एकही परदेशी नागरिक करोनाबाधित झाल्याची नोंद पालिकेकडे नाही आहे. यात विशेषत: नालासोपारा येथील नायजेरियन नागरिक अनेक वर्षांपासून राहात आहेत. त्यांनी स्वत:चे एक वेगळे जग या परिसरात तयार केले आहे. पण मागील वर्षांपासून एकही नागरिक करोनाबाधित झाल्याची नोंद सरकारी दप्तरी नाही आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सद्य:स्थितीत वसईतील पोलिसांच्या दप्तरी केवळ ५३ नायजेरियन नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे यातील बहुतांश नायजेरियन नागरिक शहरात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करीत असल्याचे उघड झाले आहे. ह्य नागरिकांचे नोंदणी झाली नसल्याने त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत यामुळे यांचे लसीकरण कशा पद्धतीने करणार. तसेच नेपाळ राज्यातून अनेक नागरिक चायनीज दुकानांवर हॉटेलमध्ये आणि सुरक्षारक्षक म्हणून सोसायटी काम करत आहेत. यांचीसुद्धा कोणतीही माहिती उपलब्ध नाही. यामुळे जर यांचे लसीकरण झाले नाही किंवा यांच्या बाधित असल्याची माहिती उपलब्ध नसेल तर भविष्यात हे लोक इतरांना संक्रमित करण्याची भीती निर्माण झाली आहे.

१९२ परदेशी नागरिकांचे वास्तव्य

मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या माहितीनुसार शहरात नायजेरियामधून ४३, श्रीलंकामधून ०८, रशियामधून ०५, इंग्लडमधून ०८, संयुक्त अरब अमिरातीमधून ०२, थायलंडमधून ०२, पेरूमधून ०२, फिलिपिन्समधून ०३, पोर्तुगालमधून ०९, रोमानियामधून ०९, सिंगापूरमधून ०१, साऊथ आफ्रिकेतून ०४, इंडोनिशियामधून ०३, इटलीमधून ०१, कझाकिस्तानमधून ०३, केनियामधून ०७, कोरियामधून ०५, लुठीयाना ०१, मॉरिसियेशमधून ०५, मोराकोमधून ०२, नेपाळमधून ०१, न्यूझीलंडमधून ०२, पाकिस्तानमधून २४, बांगलादेशमधून ०४, ऑस्ट्रेलियामधून ०४, अमेरिकेमधून १३, बेलारसमधून ०१, बेलगममधून ०१, कामेरूनमधून ०१, कॅनडामधून ०६, चीनमधून ०३, मोझांबिकमधून ०२, येमेनमधून ०१, स्पेनमधून ०१, सुदानमधून ०१, उगांडामधून ०४, अर्मेनियामधून ०१, बैरनमधून ०१ असे ३९ देशांतील १९२ परदेशी नागरिक सध्या परवानगीसहित शहरात राहात आहेत. त्यात बेकायदेशीर राहणाऱ्या नागरिकांची आकडेवारी मोठी असू शकते.

याबाबत अजूनही शासनाकडून कोणतेही निर्देश आले नाहीत, पण पालिका या नागरिकांचा नक्की विचार करेल याबाबत पोलीस आणि इतर दूतावास संघटनांशी संपर्क साधून या नागरिकांची माहिती घेतली जाईल आणि त्यांचे लसीकरण कसे करता येयील याचे नियोजन केले जाईल.

– सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका (प्रभारी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 2:22 am

Web Title: foreign nationals deprived of vaccinations ssh 93
Next Stories
1 साताऱ्यात जम्बो रुग्णालयाबाहेर सुरक्षारक्षक म्हणून ‘बाउन्सर’!
2 जिल्ह्याचे करोना संसर्गाचे प्रमाण पंधरा दिवसात ५१ वरून १६ टक्क्य़ांवर!
3 करोना संकटात फडणवीसांचे काम कौतुकास्पद – कोल्हे
Just Now!
X