घरात कोंडलेल्या बिबटय़ाला पकडण्यात वनखाते अपयशी

भुकेपोटी भरकटलेला बिबटय़ा बछडय़ासह घरात घुसला असता, दरवाजे लावून त्यांना बंदिस्त केले गेल्याची घटना काल शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कराड तालुक्यातील चोरमारवाडी-येणपे येथे घडली. याबाबतची खबर लगेचच ग्रामस्थांनी पोलीस व वनखात्याला दिली. मात्र, १३ तास कमराबंद राहिलेल्या बिबटय़ाने अखेर गुंगारा देत डोंगराच्या दिशेने धूम ठोकल्याने आणि बछडय़ाचा सुगावा न लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनखात्याच्या या अपयशावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

चोरमारवाडी येथे बाबासो, हणमंत व महादेव चोरमारे यांचे एकत्र कुटुंब आहे. काल शनिवारी रात्री घरातील सर्वजण जेवन करून झोपण्याच्या तयारीत असताना बाबासाहेब यांच्या सूनबाई वनिता संदीप चोरमारे या अंगणात भांडी घासत बसल्या होत्या. यावेळी त्यांना स्पर्श करून बिबटय़ा व त्याचे बछडे घरात घुसले. पण, प्रारंभी हे पाळीव श्वान असावेत असा अंदाज वनिता यांनी बांधला. मात्र, त्यांनी बारकाईने पाहिले असता बिबटय़ाने बछडय़ासह घरात प्रवेश केल्याचे त्यांच्या ध्यानात आले. यावर वनिता यांनी आरडाओरडा करून कुटुंबातील व शेजारच्या लोकांना बोलावले. त्यावेळी गोंधलेल्या बिबटय़ाचा घरातील हौसाबाई चोरमारे यांच्या हातावर पंजा पडल्याने हौसाबाई घाबरून अंगणात धावल्या. तर, प्रसंगावधान ओळखून बाबासाहेबांनी कुटुंबातील सर्वाना घराबाहेर काढून दरवाजे बंद करून बिबटय़ा व बछडय़ाला कोंडले आणि याबाबतची खबर पोलीस व वनखात्याला देण्यात आली. वनखात्याने आज रविवारी पहाटेपासून अनेक क्लृप्त्या लढवत चोरमारे कुटुंबीयांच्या दहा खोल्यांची झाडाझडती घेतली. परंतु, बिबटय़ा घरात नसल्याचा निष्कर्ष त्यांना काढणे भाग पडले. परंतु, बिबटय़ा व बछडा घरातच असल्याचा दावा करीत त्यांना जेरबंद करा अशी मागणी चोरमारे परिवाराने केल्याने घरावरील कौले उचकटून पाहिले असता माळय़ावर कोपऱ्यात बिबटय़ा बसल्याचे निदर्शनास आले. यावर संपूर्ण घरावर जाळी अच्छादून बिबटय़ाला पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ही जाळी कुचकामी ठरली. बिबटय़ाने सर्वाना गुंगारा देऊन डोंगराच्या दिशेने धूम ठोकली. पण, प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानुसार बछडा कुठे आहे हा वनखात्याला प्रश्न असून, बछडा मिळून येत नसल्याने चोरमारे कुटुंबीय व पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर, बिबटय़ाला पकडण्याची कामगिरी अपयशी ठरल्याने वनखात्याला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.