महाड तालुक्यातील लोअरतुडील येथे नव्याने सुरू असलेले अंगणवाडी इमारतीचे बांधकाम वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली असून  वन विभाग, पंचायत समिती, एकात्मिक विकास प्रकल्प विभागाला याची काहीच माहिती नाही. तरीही ग्रामपंचायतीने सादर केलेला प्रस्ताव जि.प.बांधकाम विभागाने मंजूर केला असल्याचे समजते. या बाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी लोअरतुडील ग्रामस्थांनी केली आहे.
एकात्मिक विकास बाल प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागांमध्ये अंगणवाडीचे वर्ग भरविले जातात. महाड तालुक्यांमध्ये ज्या अंगणावाडय़ांना स्वतंत्र इमारत नाही, तेथील अंगणवाडय़ांचे वर्ग गावांतील मंदिरांत अथवा खाजगी जागेमध्ये भरविल्या जातात. लोअरतुडील येथील अंगणवाडीला स्वतंत्र इमारत नसल्याने गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नामोळेकोंड येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये भरविण्यात येत होती. इमारतीचा सुमारे ५ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शासनाकडून मिळणारे भाडे बंद झाले त्यामुळे मंदिरामध्ये भरविण्यात येत असलेली अंगणवाडी बौद्धवाडीत हलविण्यात आली. सध्या बौद्धवाडीमधील डॉ. बाबासाहेब अंबेडकर सभागृहामध्ये अंगणवाडी भरविण्यात येते. लहान मुलांची होणारी गैरसोय पाहून ग्रामपंचायतीने नवीन इमारतीचा प्रस्ताव सादर केला. त्यासाठी शाळेच्या बाजूला असलेली जागा निवडण्यात आली. परंतु सदरची जागा वन विभागाची असल्याचे समजते. परंतु ग्रामपंचायतीकडून आलेल्या प्रस्तावाची चौकशी न करता इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. या बाबत महाड येथील वनविभागाशी संपर्क साधला असता अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. महाड येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधला असता नवीन इमारत बांधण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली. परंतु सदरची इमारत वन विभागाच्या जागेत बांधली जात आहे किवा नाही याची चौकशी करण्यात येईल असे तेथील विस्तार अधिकारी यांनी सांगितले. लोअरतुडील ग्रामपंचायतीने अंगणवाडी इमारतीचा प्रस्ताव कोणत्या जागेचा केला आहे, याची माहिती मिळू शकत नसली तरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला कोणत्या प्रकारचे प्रस्ताव सादर करण्यात आले याची चौकशी करणे आवश्यक आहे.
अंगणवाडीची इमारत ज्या भागांत लहान मुलांची संख्या अधिक आहे, त्या ठिकाणी उभारणे आवश्यक असताना इमारतीची जागा निवडतानादेखील राजकारण केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. नामोळेकोंड वाडींतून अंगणवाडीमध्ये येणाऱ्या लहान मुलांची संख्या अधिक असताना सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांतील मराठी शाळेच्या शेजारच्या जागेत अंगणवाडीची इमारत बांधताना कोणता निकष लावण्यात आला असा प्रश्रां ग्रामस्थ विचारीत आहेत. या प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा परिषदेमधील प्रतोद सुभाष पाटील यांनी सखोल चौकशी करावी व गावांतील लहान मुलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.