News Flash

वनाधिकारी, कर्मचाऱ्यांकडून नक्षलवाद्यांना रसद

पूर्व विदर्भातील दुर्गम भागात काम करणारे वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी नक्षलवाद्यांना केवळ साहित्यच पुरवत नाहीत,

| January 9, 2014 01:45 am

पूर्व विदर्भातील दुर्गम भागात काम करणारे वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी नक्षलवाद्यांना केवळ साहित्यच पुरवत नाहीत, तर या चळवळीला आर्थिक रसद देण्यात सुद्धा सक्रिय असतात, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. नक्षलवादी व वनखात्यातील या संबंधांचा सखोल तपास करण्याची गरज असल्याचे मत आता पोलीस खात्यातील अधिकारी बोलून दाखवत आहेत.
गोंदिया जिल्हय़ातील गोठणगावचे वनाधिकारी श्रीराम कुळमेथे यांना काल, मंगळवारी पोलिसांनी नक्षलवाद्यांना साहित्याचा पुरवठा केल्याच्या आरोपावरून अटक केली. तीन महिन्यांपूर्वी याच आरोपावरून या जिल्हय़ातील याच खात्यातील एक अधिकारी तसेच दोन कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. आठ दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्हय़ात वनखात्यात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी नक्षलवाद्यांना बिनतारी यंत्रणेचा पुरवठा करताना पकडले होते. पोलिसांनी नक्षलवादी व या खात्यातील अधिकाऱ्यांच्या संबंधांचे जाळे आता खणून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गडचिरोली जिल्हय़ातील वडसा वनविभागात रोहयोच्या कामांत गेल्या चार वर्षांंत १२ कोटींचा गैरव्यवहार झाला. या गैरव्यवहारात नक्षलवादी सुद्धा सामील होते, अशी माहिती आता समोर येत आहे.
या विभागातील अनेक अधिकारी या गैरव्यवहारात गुंतले आहेत. या अधिकाऱ्यांनी नक्षलवाद्यांना अनेकदा आर्थिक रसद पुरवली असल्याची माहिती  समोर येत आहे. या गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार असलेला एक अधिकारी नक्षलवाद्यांचे नाव सांगून इतर अधिकाऱ्यांना रोहयोच्या कामात आर्थिक अफरातफर करण्यास भाग पाडत असे, अशी माहिती आता समोर येत आहे. या गैरव्यवहारात सामील होण्यास नकार देणाऱ्या एका अधिकाऱ्याला नक्षलवाद्यांच्या नावाने धमकी देण्यात आली. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण चव्हाटय़ावर आणल्यानंतर आता या अधिकाऱ्याच्या बदलीसाठी कर्मचारी संघटनांना आंदोलन करण्यास भाग पाडण्यात आले. या आंदोलनाला सुद्धा नक्षलवाद्यांची फूस आहे असे तपासात आढळून आले आहे. या गैरव्यवहाराची चौकशी होऊ नये म्हणून नक्षलवादी प्रयत्न करीत असल्याची बाब वनखात्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा ठाऊक आहे. मात्र, कुणीही या विषयावर गंभीरपणे विचार करायला तयार नाही. उलट नक्षलवाद्यांच्या माध्यमातून का होईना हे प्रकरण दडपले गेले तर चांगलेच आहे अशी भूमिका या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळेच या खात्याच्या प्रधान सचिवांनी आदेश देऊन सुद्धा अजूनही या प्रकरणाची चौकशी सुरू झालेली नाही. या संपूर्ण घटनाक्रमावर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हा प्रकार अतिशय गंभीर असल्याची प्रतिक्रिया  ‘लोकसत्ता’शी बोलताना बुधवारी व्यक्त केली. शासकीय योजना अपयशी ठरवण्यासोबतच त्यातून आर्थिक मलिदा लाटणे हा नक्षलवाद्यांच्या डावपेचाचा एक भाग आहे. त्याला वनखात्यातील अधिकारी बळी पडणे ही गंभीर बाब असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 1:45 am

Web Title: forest officer workers of east vidarbha supply food to naxalite
टॅग : Forest Officer,Naxalite
Next Stories
1 कारागीर रोजगार हमी योजनेची घसरण
2 रावेर कारखाना विक्री निर्णयास स्थगिती
3 सेवाग्राम आश्रम परिसराच्या विकासकामांना लवकरच सुरुवात
Just Now!
X