हर्षद कशाळकर

सातत्याने लागणाऱ्या वणव्यांमुळे रायगड जिल्ह्यातील वनसंपदा धोक्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वणव्यातील ९० टक्के वणवे हे मानवनिर्मित आहेत. वणव्यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तींची तर हानी होतेच आहे, त्याचबरोबर जंगलातील पशुपक्ष्यांचे अस्तित्वही धोक्यात येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. वणवे रोखण्यासाठी वनविभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ‘फायर ब्लॉ’सारख्या यंत्रसामुग्रीचा वापर सुरू झाला आहे. पण वणवे लागण्याचे प्रमाण अद्याप आटोक्यात आलेले नाही.

रायगड जिल्ह्यात ३५ हजार हेक्टर खासगी, तर १ लाख ७ हजार हेक्टर सरकारी वनक्षेत्र आहे. यात माथेरानसह फणसाड आणि कर्नाळा अभयारण्य परिसराचाही समावेश आहे. अत्यंत दुर्मीळ वन्य प्रजाती येथे वास्तव्य करीत आहेत. मात्र हिवाळ्य़ाच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला लावण्यात येणाऱ्या वणव्यांमुळे या वनसपंत्तीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. २०१४-१५ मध्ये वणवे लागण्याच्या जिह्यात ७९ घटना घडल्या. यात ५८५ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले. २०१५-१६ मध्ये वणवे लागण्याच्या तब्बल १८६ घटना घडल्या. यात १ हजार ०३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले २०१६-१७ मध्ये डिसेंबर अखेर वणवे लागण्याच्या ९६ घटनांची नोंद झाली. यात ६१३ हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील वनसंपदा बाधित झाली. गेल्या दोन महिन्यांत जिह्यात वणवे लागण्याच्या २५ घटना घडल्या आहेत.

स्थानिकांमध्ये असलेला गैरसमजातून हे वणवे लावले जातात. जंगलांना वणवे लावले की पुढील वर्षी जंगलात चांगले गवत उगवते. हे गवत जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त ठरते. म्हणून दरवर्षी उन्हाळ्यात जंगलांना आगी लावल्या जातात. दुसरीकडे सरपणाला लाकूड मिळावे यासाठी डोंगरालगत राहणारे गावकरी वणवे पेटवतात. वणव्यांमुळे झाडे सुकतात आणि पर्यायाने हे लाकूड सहज तोडता येते. कधी कधी शिकारीसाठीही हे वणवे लावले जातात. शेतात राब जाळण्याची प्रथा अनियंत्रित वणव्यांना जन्म देते. सातत्याने लावल्या जाणाऱ्या या आगींमुळे कोकणातील वनसंपदा अडचणीत आली आहे. वन्यजीवांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. पशुपक्ष्यांचे हकनाक बळी जातात. सुरुवातीला जंगलापुरता मर्यादित असणारा हा प्रश्न आता आसपासच्या परिसरासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. अनियंत्रित वणवे आता जंगलालगतच्या गावात शिरण्यास सुरुवात झाली आहे.

वणव्यांमुळे प्रदेशनिष्ठ वनस्पती धोक्यात येत आहे. यात प्रामुख्याने गवताळ कुरणे, दगडफूल, सोनकी प्रकार, कारवी जाती, पानफुटी, कलारगा झाडी, तेरडा, श्वोतांबरी, रानआले, सोनजाई, गजकर्णिका, रानकेळी, सापकांदा, टोपली कारवी, कुळी कापुरली संजीवनी, सर्पगंधा, अश्वागंधा यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे. तर घुबड, चंडोल, रॉबिन रानकोंबड्या, मोर, सापांच्या प्रजाती गवतावरील कीटक, उंदीर, भेकरे यांसारख्या पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कोकणात १८४ प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही वणव्यांमुळे अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे वनांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांची ठोस अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

वणव्यांचे वाढते प्रकार लक्षात घेऊन अलिबागच्या वन विभागाने  ‘फायर ब्लॉ’ या यंत्राचा वापर सुरू केला आहे. उप वनसंरक्षक अलिबाग याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ११ परिक्षेत्राना  फायर ब्लॉ ही अद्यावत यंत्रे देण्यात आली आहेत. या यंत्राद्वारे फायर लाइन मारणे, आग विझवणे यासारखी कामे जलदगतीने केली जात आहेत. जंगलाशेजारी राहणाऱ्या लोकांचे प्रबोधनही केले जात आहे. त्याचबरोबर वणवे विझविण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘हॅलो फॉरेस्ट’ या शीघ्र प्रतिसाद देणाऱ्या हेल्पलाइनची सुरवात केली आहे. मात्र तरीही वणवे लागण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.

जिल्ह्यातील वनक्षेत्र खूप जास्त आहे. त्या तुलनेत वनविभागाकडे असणारा कर्मचारी वर्ग अतिशय कमी आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचारी वर्गाचा वापर करून वनंसंवर्धनाचे काम केले जात आहे. पण त्याला मर्यादा पडत आहेत. गावकऱ्यांनी यासाठी वनविभागाला सहकार्य करणे अपेक्षित आहे.

रायगड जिह्यातील बहुतांश वन ही घनदाट आहेत. त्यामुळे या वनांमध्ये वणवे लागले तर ते नियंत्रित करणे अवघड झाले. वणवे लागू नये म्हणून उन्हाळ्यापूर्वी वन विभागाकडून संरक्षित पट्टे तयार केले जातात. मात्र हे प्रमाण कमी असते. संरक्षित पट्टे तयार करण्याचे काम जास्त प्रमाणात व्हायला हवे. यासाठी पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या स्थानिक सामाजिक संस्थाची मदत घ्यायला हवी.

  • प्रवीण कवळे, पक्षी आणि पर्यावरण अभ्यासक

 

वणव्यामुळे पशुपक्ष्यांचे अधिवास नष्ट होतो, एकदा अधिवास नष्ट झाला तर वनजीवामध्ये असुरक्षितेची भावना निर्माण होते. त्यामुळे सातत्याने लागणारे वणवे रोखणे गरजेचे आहे. लोकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे.

  • राकेश काठे, संघटक निसर्गप्रेमी ग्रुप