मध्य भारताची ओळख असलेला रानम्हशी हा प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अर्थात, या गव्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी वन्यजीवतज्ज्ञ आणि वन मंत्रालय अहोरात्र मेहनत घेत असतानाच त्यांच्या या प्रयत्नांना आशेची नवी पालवी फुटली आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील कोलामारका भागात या प्राण्यांच्या कळपाची छायाचित्रांत त्यांचे अस्तित्व जाणवत आहे.
सध्या छत्तीसगढ राज्यात रानम्हशी शिल्लक आहे. म्हणूनच या जातीचे वंशसातत्य टिकविण्यासाठी कृत्रिम गर्भधारणा करण्याचा प्रयोग तातडीने हाती घेण्याचा विचार वन मंत्रालय करीत आहे. यंदाच्या जानेवारी ते मे या कालावधीत घेण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये तीन ते पाच रानम्हशी आढळून आले आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्य़ातील कळपात किमान चार मादी आढळल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाचे तज्ज्ञ सदस्य जॉन मॅथ्यू यांनी दिली. या माद्या आडदांड आणि पूर्णत: जंगली आहेत.
त्यांचा पाळीव रेडय़ांशी कोणताही संग झालेला नाही, असे दिसून येत आहे. याच वेळी आसाममधील मादी गव्यांचा तेथील पाळीव रेडय़ांशी संग झालेला असल्याने तेथे या जातीच्या वाढीची शक्यता वाढीस लागली आहे. मात्र यामुळे त्या पूर्णपणे जंगली राहिल्या आहेत, असे म्हणता येणार नाही, असे मॅथ्यू यांनी आपल्या अभ्यासात नमूद केले आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ात अहेरी तालुक्यातील कोलमारका भागात रानम्हशींचे किमान दोन कळप आहेत; परंतु या परिसरात नक्षलींच्या कारवाया लक्षात घेऊन त्यांच्यावरील टेहळणी करणे अवघड होऊन बसले आहे. त्यांचा वावर आणि अधिवास शोधून काढण्यासाठी आजवर आखण्यात आलेल्या अनेक मोहिमा आणि छायाचित्रे घेण्याचे प्रयत्नांना यामुळेच यश येऊ शकलेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
तरीही उपवनसंरक्षक म्हणून येथे कार्यरत असलेल्या शुक्ला यांनी रानम्हशींची तस्करी मोडून काढण्यातच आपली धडाडी ठेवलेली नाही, तर या जातीची इत्थंभूत माहिती आणि त्यांची छायाचित्रे जमवण्यासाठी स्थानिकांची मदत घेतली आहे. यासाठी वनपाल आणि इतर कर्मचाऱ्यांचाही वाटा आहे. त्यांनी किमान दोन रानम्हशींनाही कॅमेऱ्यात बंद केलेले आहे.