लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान, शहर पोलिसांनी ९ एप्रिल रोजी विजयनगर येथे नाकाबंदीत पकडलेली साडेसहा लाखांची रोकड आयकर विभागाच्या चौकशीअंती संबंधितांना परत करण्यात आली. आयकर खात्याने या रक्कमेबाबत चौकशी केल्यानंतर ती रक्कम व्यवहारातील असल्याचे स्पष्ट झाले. साडेसहा लाखांची रक्कम वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत परत करण्यात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच गेल्या पंधरा दिवसात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. कराड शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. ९ एप्रिल रोजी सकाळी सहायक फौजदार डी. डी. तिताडे, हवालदार ए. डी. पाटील, एस. बी. लोखंडे, बाळासाहेब पाटील, सरफराज नदाफ हे विजयनगर टोलनाका येथे वाहनांची तपासणी करत होते. यावेळी मोरगिरी येथील संदीप चंद्रकांत कोळेकर होंडासिटी कारमधून पाटणकडे निघाले होते. त्यांच्या कारची तपासणी केली असता मागील सीटवर प्लास्टिकच्या पिशवीत साडेसहा लाख रुपयांची रक्कम असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी रक्कम जप्त करून ताब्यात घेतली. याप्रकरणाचा अहवाल निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांच्याकडे पाठवण्यात आला. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रकमेबाबत कोळेकर यांच्याकडे चौकशी करून त्यांचा जबाब घेतला होता. राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्याने पोलिसांनी याप्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले होते. सलग पंधरा दिवस रकमेबाबत योग्य पध्दतीने तपास करून चौकशी करण्यात आली. चौकशीत व कोळेकर यांनी सादर केलेल्या पुराव्यात साडेसहा लाखांची रक्कम बांधकाम व्यवसायातील व्यवहारातील असल्याचे स्पष्ट झाले. तसा अहवाल आयकर विभागाने कराड पोलिसांना पाठवला. या अहवालानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सदरची रक्कम संबंधितांना परत दिली.