सत्तेसाठी भाजपने नरेंद्र मोदी यांचा उदो उदो सुरू केला. भाजपलाच नाहीतर शिवसेनेलाही आता बाळासाहेबांचा विसर पडला. शिवसेना जन्माला घालणाऱ्या बाळासाहेबांना विसरणाऱ्या सेनेकडून राजकीय स्वार्थासाठी आता मोदीनामाचा जप सुरू झाल्याची टीका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केली.
राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जाहीर सभा झाली. राज्यमंत्री फौजिया खान, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे व सुरेश वरपुडकर, खासदार गणेश दुधगावकर, माजी खासदार तुकाराम रेंगे, सुरेश जाधव, आमदार बाबाजानी दुर्राणी, सुरेश जेथलिया, सतीश चव्हाण, विक्रम काळे, उमेदवार भांबळे आदी उपस्थित होते.
तुम्ही आजवर सेनेला निवडून दिले; पण सेनेच्या खासदारांना तो पक्ष आपला वाटला नाही. जो पक्ष समाजातल्या सर्व घटकांची काळजी करीत नाही, अशा पक्षाला ताकद देण्यापेक्षा राष्ट्रवादीला निवडून द्या. जातिधर्माच्या नावावर विद्वेष पसरविणाऱ्या लोकांच्या हाती सत्ता देऊ नका, असे आवाहन पवार यांनी केले. वयाच्या २७व्या वर्षी आपल्याला यशवंतराव चव्हाणांनी विधानसभेचे तिकीट दिले. त्यामागे पुढच्या २५ वर्षांचे राजकारण-समाजकारण उभारण्याची फळी निर्माण करण्याचे धोरण होते. भांबळे यांच्यासारख्या तरुण उमेदवाराला संधी देऊन विकासास सहकार्य करावे, असे ते म्हणाले. संबोधी अकादमीचे अध्यक्ष भीमराव हत्तीअंबिरे, सोनाली देशमुख, उपेंद्र दुधगावकर, मनोज पवार, शिवाजीराव देशमुख भोगावकर आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. हत्तीअंबिरे यांच्या कामाचा उपयोग राज्यासाठी करून घेण्यात येईल, असे पवारांनी सांगितले.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. गुजरात दंगलीत निरपराध माणसे मारली गेली. पण मोदींना साधी दिलगिरी व्यक्त करावी वाटली नाही. अशा व्यक्तीला पाऊल न ठेवू देण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला. अल्पसंख्य समाजाला दंगलीत ‘लक्ष्य’ करणाऱ्या मोदींना जराही खंत नाही. भरधाव गाडीखाली एखादे कुत्र्याचे पिलू आल्यानंतर वाईट वाटतेच, असे म्हणणाऱ्याच्या हाती देश देणे हा धोका आहे, असे ते म्हणाले. भांबळे हे काँग्रेस आघाडीचे संयुक्त उमेदवार असून सर्वानी प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी राहावे, काही ठिकाणी अडचणी आहेत, पण अडचण निर्माण करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी आमदार बोर्डीकरांचे नाव न घेता सांगितले.
अॅड. प्रताप बांगर यांनी बोर्डीकर व सेना उमेदवार संजय जाधव यांच्यावर टीका केली. बोर्डीकरांच्या जिल्हा बँकेतील विमा घोटाळय़ाबाबत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष स्वराज परिहार, भांबळे यांनी संघर्षांची भूमिका घेतल्यानंतर विरोधक म्हणून सेना रस्त्यावर उतरेल, असे वाटले होते, पण जाधव यांनी बोर्डीकरांच्या विरोधात भूमिका घेतली नाही. अशा तडजोडवादी प्रवृत्तींना धूळ चारून जिल्ह्याच्या राजकारणाचे शुद्धीकरण करा, असे आवाहन बांगर यांनी केले. भरोसे यांनीही जाधव यांच्यावर टीका केली. विजय वाकोडे, हंडोरे आदींची भाषणे झाली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, डॉ. मधुसूदन केंद्रे, रामराव वडकुते आदी उपस्थित होते.
तोडीस तोड सभा!
धनगर समाजाच्या वतीने घोंगडी व काठी देऊन पवार, चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. आदल्याच दिवशी स्टेडियम मदानावर शिवसेनेची सभा झाली होती. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीने तोडीस तोड शक्तिप्रदर्शन केले.