रोजगार हमी योजना, इबीसी सवलत आणि कापूस एकाधिकार योजनेचे जनक. हैद्राबाद मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि महाराष्ट्र एकीकरण चळवळीतील झुंजारसेनानी. नैतिक राजकारणाचा मानबिंदू ज्यांच्या नावाचा सबंध महाराष्ट्रात आदराने उल्लेख केला जातो, त्या भाई उध्दवराव पाटील यांच्या जन्मशताब्दीचा विसर महाराष्ट्राच्या विधीमंडळाला पडला आहे. महाराष्ट्र विधीमंडळाच्या वि. स. पागे प्रशिक्षण केंद्राच्यावतीने गुरुवारी विधीमंडळाच्या सभागृहात राज्यातील धुरिणांना जन्मशताब्दीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकापच्या भाई उध्दवराव पाटील यांच्या नावाचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही.

ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकर्‍यांचे प्रतिनिधीत्व करणारा कणखर आवाज म्हणून भाई उध्दवराव पाटील यांचा आजही आदराने उल्लेख केला जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दिलेले योगदान, गोवामुक्ती आंदोलनात घेतलेला सक्रिय सहभाग, रझाकाराच्या जाचक वरवंट्याखाली भरडल्या गेलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हैद्राबाद मुक्ती संग्रामात झोकून देवून त्यांनी केलेले काम किंवा संयुक्त महाराष्ट्र लढा यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेवून मराठी भाषिकांच्या हक्कासाठी उभारलेले आंदोलन, अशा कितीतरी लढ्यात स्वतःला झोकून देणारे भाई उध्दवराव पाटील म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा खराखुरा चेहरा आहेत. ३० जानेवारी उध्दवराव पाटील यांच्या जन्मशताब्दीची सांगता झाली आहे. मात्र मागील वर्षभराच्या कालावधीत सरकारी स्तरावर उध्दवराव पाटील यांच्या कार्याची आणि स्मृतिंची जन्मशताब्दी वर्षातही उपेक्षाच झाली आहे.

raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
ashok chavan raj thackeray
राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागाबाबत अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…
Uday Samant Nagpur
“रत्नागिरी – सिंधुदुर्गवर आमचाच हक्क” – उदय सामंत
Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार

महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी उध्दवराव पाटील यांनी हैद्राबाद सभागृहाचे प्रतिनिधीत्व केले. ग्रामीण भागातील कष्टकर्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यानंतर मुंबई सभागृहाचे प्रतिनिधीत्व, देशाच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातून शेतकरी आणि कष्टकर्‍यांचा बुलंद आवाज मांडणारे उध्दवराव पाटील आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत एखाद्या विषयावर मांडणी करण्यासाठी ते उभे ठाकले असता, विरोधकही मन लावून त्यांची भाषणे ऐकत. रोजगार हमी योजनेचा कायदा, कापूस एकाधिकार किंवा इबीसी सवलतीसारखी आजही अंमलात आणली जाणारी महत्वपूर्ण योजना भाई उध्दवराव पाटील यांच्यामुळे अस्तित्वात आली आहे. जानेवारी 2019 मध्ये त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली. उस्मानाबाद शहरात झालेले एक-दोन महत्वपूर्ण कार्यक्रम वगळता राज्यात एकाही ठिकाणी त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सरकारी पुढाकारातून कार्यक्रम झाले नाहीत.

गुरुवारी महाराष्ट्र विधीमंडळाच्या सभागृहात वि. स. पागे प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, सहकारमहर्षी यशवंतराव मोहिते, लोकनेते राजारामबापू पाटील आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. रफीक झकेरिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष सोहळा आयोजित केला होता. याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते आवर्जून उपस्थित होते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा असलेल्या मान्यवरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यात महाराष्ट्राला सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून आजही स्मरणात असलेल्या भाई उध्दवराव पाटील यांच्या नावाचा साधा उल्लेखही झाला नाही. जन्मशताब्दी वर्षातही झुंजारसेनानी उध्दवराव पाटील यांच्या वाट्याला उपेक्षाच आली, हे विशेष.