शिवसेनेचे विद्यमान खासदार सुभाष वानखेडे यांनी शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर अन्य ९जणांनी १४ अर्ज पत्र सादर केले. आतापर्यंत ७६जणांनी १८२ अर्ज नेले आहेत. वानखेडे यांचा अर्ज सादर करतेवेळी शिवसेनेचे माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा मात्र सहभागी नव्हते.
िहगोली मतदारसंघात सोमवारी २७ इच्छुकांनी ४८ अर्ज घेतले, तर ९जणांनी १४ अर्ज सादर केले. वानखेडे यांचा अर्ज सादर होत असताना त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास मिरवणूक काढण्यात आली. रामलीला मदानावरून निघालेली मिरवणूक शिवाजीनगरमाग्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. माजी आमदार गजानन घुगे, भाजपचे तान्हाजी मुटकुळे, बाबाराव बांगर यांनी वानखेडेंच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी नरेंद्र पोयाम यांच्याकडे दोन अर्ज दाखल केले. मात्र, माजी सहकारमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांची अनुपस्थिती चच्रेचा विषय होती. माजी आमदार घुगे व मुंदडा यांचा गट खासदार वानखेडेंवर आतापर्यंत नाराज होता. घुगे यांच्यासोबत वानखेडेंचे रविवारी मनोमीलन झाल्याने घुगे हे अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित होते. मुंदडा यांची नाराजी मात्र अजून दूर झाली नसल्याची चर्चा आहे.
सोमवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये प्रदीप देवसरकर, कैलास निकाळजे, सत्तार खाँ पठाण, सय्यद खादीर सय्यद मस्तान हे अपक्ष, तर भाजपचे तान्हाजी मुटकुळे, भारिपचे देवराव हरणे, लाल सेनेचे सुदर्शन िशदे, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे पांडुरंग देसाई आदी ९जणांनी १४ अर्ज दाखल केले.
जोरदार शक्तिप्रदर्शन करीत डी. बी. पाटील यांचा अर्ज
वार्ताहर, नांदेड
जोरदार घोषणाबाजी, ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून समर्थकांच्या साक्षीने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डी. बी. पाटील यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी जुना मोंढा येथे आयोजित सभेत नांदेडात कमळ फुलविण्याचा निर्धार करण्यात आला.
सकाळपासूनच वाहनांतून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची जुना मोंढा येथे गर्दी जमू लागली. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यास व देशाच्या विकासासाठी विजयी करण्याचे आवाहन नेत्यांनी सभेत केले. यानंतर भाजपचे नांदेड प्रभारी तथा प्रदेश चिटणीस विजय गव्हाणे यांच्या उपस्थितीत मिरवणुकीद्वारे उमेदवार पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. भगव्या टोप्या, भगवे रुमाल परिधान करून कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे परिसर दुमदुमून गेला. राम पाटील रातोळीकर, डॉ. धनाजीराव देशमुख, माजी आमदार अनुसयाताई खेडकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, प्रकाश कौडगे, चैतन्य देशमुख, प्रवीण साले आदी सहभागी झाले होते.