जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रारूप मतदारयादीवर तब्बल १३५ हरकती दाखल झाल्या आहेत. गुरुवारी नाशिकला विभागीय सहनिबंधक एम. ए. आरीफ यांच्यासमोर या हरकतींची सुनावणी झाली. सोमवारी (दि. २३) त्यावर निकाल देण्यात येणार असून, दि. २५ला बँकेच्या निवडणुकीची अंतिम मतदारयादी जाहीर केली जाणार आहे.
बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्राथमिक प्रकिया सध्या सुरू आहे. दि. २० फेब्रुवारीला बँकेची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. दि. १३ पर्यंत त्यावर हरकती दाखल करून घेण्यात आल्या. या हरकतींची आज नाशिकला सुनावणी झाली. जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे या सुनावणीला उपस्थित होते. सोमवारी या सुनावणीचा निकाल जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर दि. २५ ला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतरच निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग येईल.
वैद्यानाथन समितीच्या शिफारशींनुसार बँकेच्या संचालक मंडळाच्या चार जागा यंदा कमी झाल्या आहेत. आता २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात ही निवडणूक होईल, असा अंदाज आहे. विविध कारणांनी दोनदा मुदतवाढ मिळाल्याने तब्बल सात वर्षांनी बँकेची निवडणूक होत आहे.
गेल्या निवडणुकीत बँकेत राष्ट्रवादी व काँग्रेसमधील थोरात गटाची युती झाली होती. या गटाने २५ पैकी २१ जागाजिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. काँग्रेसमधील विखे गटाला त्या वेळी अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या. सध्या प्रशासकीय पातळीवर बँकेच्या निवडणुकीची प्राथमिक तयारी सुरू असली तरी राजकीय वर्तुळात मात्र अजूनही तुलनेने शांतताच आहे. जिल्हय़ातील अनेक साखर कारखान्यांच्याही निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून त्या आटोपल्यानंतर जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकीय मोर्चेबांधणीला वेग येईल, असे दिसते. दरम्यान, काँग्रेसअंतर्गत विखे गटाने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे समजते. त्यादृष्टीने विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचेही समजते.