X

स्वतंत्र राज्य निर्मिती हा घटनात्मक अधिकार

स्वतंत्र राज्याची निर्मिती करणे हा घटनादत्त अधिकार आहे.

स्वतंत्र राज्याची निर्मिती करणे हा घटनादत्त अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून मराठीची चार राज्ये निर्माण करावीत असे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी म्हटले आहे. स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघर्ष समितीची सभा कणकवलीत आयोजित केली होती, त्यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते. मातीराम गोठीवरेकर, प्रा. प्रकाश अधिकारी, संजय हंडोरे, विश्वनाथ केरकर, कृष्णा दळवी आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. नाटेकर म्हणाले की, राज्य घटनेत राज्यनिर्मितीचे दोनच प्रमुख निकष देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रदेशाला स्वतंत्र राज्य मागायचे असेल तर त्या प्रदेशातील बहुसंख्य लोकांचा या स्वतंत्र राज्याला पाठिंबा पाहिजे आणि दुसरे म्हणजे हे राज्य चालविण्यासाठी पूर्ण आर्थिक क्षमता त्या प्रदेशाची पाहिजे. याचा सरळ अर्थ असा की, त्या प्रदेशाबाहेरच्या लोकांनी कितीही नवीन राज्य निर्मितीला विरोध केला तरी काहीही उपयोग होणार नाही, असे प्रा. नाटेकर म्हणाले. महाराष्ट्रातून सध्या कोकण, विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश स्वतंत्र राज्याची मागणी करीत आहेत. लोकसभेने मंजुरी दिली तर या नवीन राज्याची निर्मिती होऊ शकते. काही अपवाद वगळता तमाम कोकणी माणसांचा स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीला एकमुखी पाठिंबा आहे. एकूण महसुलापैकी ६० टक्के महसूल कोकणातून गोळा केला जातो. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ७२० किलोमीटर लांब व  ६५० किलोमीटर रुंद असलेल्या कोकणचे स्वतंत्र राज्य निर्माण होऊ शकते, असे प्रा. महेंद्र नाटेकर म्हणाले. आम्ही राज्य होऊ देणार नाही. महाराष्ट्राचे तुकडे करू देणार नाही अशी घटनाबाह्य़ असंसदीय भाषणे संतापजनक आहेत असे प्रा. नाटेकर यांनी म्हटले आहे. स्वतंत्र राज्य निर्माण झाल्यास कोकणचे हित होईल. विदर्भाप्रमाणेच कोकणालाही स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा असे प्रा. नाटेकर म्हणाले. स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीसाठी कोकणात संघर्ष समिती काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

First Published on: April 25, 2016 12:07 am
  • Tags: dr-babasaheb-ambedkar,