महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादमध्ये भाजपाला शिवसेनेकडून धक्का देण्यात आला आहे. भाजपाचे माजी शहाराध्यक्ष किशनचंद तनवाणी हे स्वगृही परतले आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी पुन्हा एकदा शिवबंधन हाती बांधले आहे. त्यांच्याबरोबरच शिवसेनेतूनच भाजपात गेलेले माजी महापौर गजनान बारवाल यांनी देखील घरवापसी केली आहे.

‘मातोश्री’वर आज या दोघांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, औरंगाबाद पश्चिम विभागाचे आमदार संजय शिरसाट, आमदार अंबादास दानवे,  मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती होती.

स्थानिक भाजपामधली राजकारणाला कंटाळून तनवाणींनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. शिवाय, आगामी काही दिवसातच भाजपामधील अनेक आजी-माजी नगरसेवक देखील शिनवसेनेत प्रवेश करतील, अशी देखील चर्चा आहे.

एप्रिल महिन्यात औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना पुन्हा महाविकासआघाडीद्वारे निवडणूक लढवणार असल्याचे दिसत आहे. तर मनसे व भाजपाने स्वबळाचा नारा दिलेला आहे. शिवाय, औरंगाबादेत एमआयएमचे देखील आवाहन असणार आहे.