माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेसच्या नाराजीनंतरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणादरम्यान अप्रत्यक्षपणे भाजपाचे कानही टोचले. त्यांच्या भाषणानंतर मात्र काँग्रेस प्रणव मुखर्जी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून काही चुकीचं केलं नसल्याचं सांगू लागलं. काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत प्रणव मुखर्जींनी संघाला आरसा दाखवल्याचं सांगितंल.

आरएसएसचे विचारक आणि माजी भाजपा नेता के एन गोविंदाचार्य यांनी तीन महिन्यापुर्वीच कार्यक्रमाची तयारी करण्यात आल्याचं सांगितलं आहे. ‘तसं पहायला गेलं तर या गोष्टी डिसेंबर आणि जानेवारीमध्येच ठरवल्या जातात. मार्चपर्यंत नावावर शिक्कामोर्तब केलं जातं. कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी पाच ते सहा नावे ठरवली जातात. त्या सर्वांशी चर्चा केली जाते, भेटीगाठी केल्या जातात. यावेळी सर्वात पहिलं नाव प्रणव मुखर्जींचं असण्याची शक्यता आहे आणि ते येण्यासाठी तयार झाले असावेत’, असं त्यांनी सांगितलं.

जुन्या आठवणींबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘१९९६-९७ मध्ये दिल्लीच्या नॉर्थ अॅव्हेन्यूमध्ये प्रणव मुखर्जी रोज फिरण्यासाठी येत असत. तिथेच एक पार्क होतं, जिथे संघाची शाखा असायची. पार्कच्या जवळच ते फिरत असत. प्रणव मुखर्जी दिसल्यावर स्वयंसेवक त्यांना आदराने नमस्कार करत असत’.

काय बोलले प्रणव मुखर्जी ?
Pranab Mukherjee at RSS Event : वसुधैव कुटुंबकम् हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. भारताला पाच हजार वर्षांची संस्कृती आहे आणि विशेष बाब म्हणजे ही संस्कृती अद्यापही टिकून आहे ही बाब गौरवशाली आहे असे मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. एवढेच नाही तर प्रत्येकाने देशाबाबत निष्ठा बाळगणे हीच देशभक्ती आहे असेही त्यांनी म्हटले. हेडगेवार हे भारतमातेचे सुपुत्र आहेत आहेत अशी प्रशंसा प्रणव मुखर्जी यांनी केली. तसेच आपल्या भाषणात भारतीय संस्कृतीचे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यांचे गुणगान गायले. विशेष बाब म्हणजे आपल्या भाषणात त्यांनी टीकाकारांचा उल्लेखही केला नाही.

आपल्या भाषणात सम्राट अशोक, सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्यापासून महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्यापर्यंतचे दाखले त्यांनी दिले. जनतेच्या आनंदातच राजाचा आनंद असायला हवा असे मत यावेळी प्रणवदांनी व्यक्त केले. विविधता ही भारताची शक्ती आहे कारण देशात विविधता असूनही आपण सगळे भारतीय आहोत ही बाब आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवते असेही प्रणवदांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादाबाबत ते म्हटले की, राष्ट्रवाद हा कोणत्याही भाषा, रंग, जात, धर्माशी संबंधित नसतो. तसेच असहिष्णुतेमुळे देशाची ओळख धूसर होऊ लागते. देशाप्रती प्रत्येकाने खऱी निष्ठा बाळगणे हीच खरी देशभक्ती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यात अनेकांचे योगदान होते. त्यानंतर १९५० मध्ये घटना तयार झाली. या संविधानामुळे राष्ट्रीय भावना दृढ होते. विविधता आणि त्यातील एकता हेच आपल्या देशाचे सौंदर्य आहे असेही त्यांनी म्हटले आहे.