माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकारला आव्हान
राज्याच्या तिजोरीवरील कर्ज कमी करून दाखवा, राजकारण सोडू असे जाहीर आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर काहीतरी घटना घडेल, अशी भविष्यवाणी चव्हाण यांनी केली. ते पंढरपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंढरपूरला शुक्रवारी धावती भेट दिली. या वेळी चव्हाण यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर येथील विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री व इतर मंत्री काँग्रेस सरकारने राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा डोंगर उभा केला आहे, तिजोरी खाली केली आहे, असा आरोप करतात. माझ्या माहितीनुसार सध्या राज्य सरकारवर ३ लाख ५० हजार कोटी एवढे कर्ज आहे. यातील एक हजार कोटी रुपयांचे कर्ज जर राज्य सरकारने कमी करून दाखवले तर राजकारण सोडीन, असे आव्हान चव्हाण यांनी दिले. निवडणुकीच्या वेळी भाजपने वाट्टेल त्या घोषणा केल्या. मात्र त्या आता पूर्ण होत नसल्याचे दिसून आल्यावर काहीतरी गोलमाल करीत असल्याचे चव्हाण म्हणाले.