माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या हट्टाने मंत्री कक्षाबाहेर

पद गेले तरी त्याच्या लाभाची हौस सुटत नाही असाच काहीसा प्रकार नुकताच मिरज येथील सरकारी विश्रामगृहामध्ये घडला. वरिष्ठ मंत्र्यांसाठीच राखून ठेवलेला कक्ष हवा असा हट्ट एका माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केला आणि त्याच वेळी राज्याचे एक वरिष्ठ मंत्री तिथे पोहोचल्याने यातून हे ‘राजकीय मानापमान’ नाटय़ रंगले. माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने हा कक्ष न सोडल्याने अखेर या सर्व घटनेचा निषेध म्हणून या मंत्र्यांनी त्यांच्या वाहनात बसून जेवण घेतले. या साऱ्या प्रकाराने अधिकारी वर्गाची भंबेरी उडाली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सरकारी विश्रामगृहामध्ये काही कक्ष हे कायम मुख्यमंत्री किंवा त्या दर्जाच्या अन्य मंत्री वा पदाधिकाऱ्यांसाठी राखून ठेवलेले असतात. मिरजेतील विश्रामगृहातदेखील एक कक्ष अशाच अतिविशिष्ट व्यक्तीसाठी राखून ठेवलेला आहे. काही दिवसांपूर्वी एका माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी मिरजेत आल्या होत्या. त्यांच्यासाठी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील विश्रामगृहात एक कक्ष आरक्षित केला होता; परंतु प्रत्यक्ष विश्रामगृहावर पोहोचल्यावर त्यांनी आपल्याला अतिविशिष्ट व्यक्तीसाठी राखून ठेवलेला कक्ष देण्याची मागणी केली. त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनीही यासाठी हट्ट धरल्यावर या माजी मुख्यमंत्री पत्नीने आपला मुक्काम या व्हीआयपी कक्षात हलवला. दरम्यान, याच वेळी राज्य मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील हे एक बैठक संपवून या विश्रामगृहात दाखल झाले. या वेळी त्यांच्यासाठी आरक्षित कक्ष अगोदरच वापरात असल्याचे पाहून त्यांनी कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. दरम्यान, माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने हा कक्ष सोडण्यास नकार दिल्याने या गोंधळात अजून भर पडली.

दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी अन्य कक्ष देण्याची तयारी दर्शवली, पण या वरिष्ठ मंत्र्यांनी त्यास नकार दिला. या सर्व घटनेचा निषेध म्हणून त्यांनी त्यांच्या वाहनात बसून जेवण घेतले. तसेच याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली.