काँग्रेस महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे राजीनाम्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचं कारण आहे ते चंद्रपुरात व्हायरल झालेली एक ‘ऑडिओ क्लिप’ एका कार्यकर्त्याशी अशोक चव्हाण बोलत आहेत. हा कार्यकर्ता चंद्रपुरातल्या जागेबाबत बोलत असताना अशोक चव्हाण त्याला सांगत आहेत की पक्षात माझं कोणीही ऐकत नाही. ही क्लिप व्हायरल झाली आहे आणि त्यामुळेच हा अंदाज वर्तवला जातो आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. मात्र अशोक चव्हाण यांनी आपण ही क्लिप ऐकली नसल्याचे म्हटले आहे. असे असले तरीही अशोक चव्हाण पक्षात नाराज आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अशोक चव्हाण यांनी या संदर्भात बोलताना असे स्पष्टीकरण दिले आहे की, खासगी संभाषण पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा विषय नाही. हे सगळे अंतर्गत विषय आहेत, चंद्रपुरात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे हे माझे काम आहे. मी क्लिप ऐकलेली नाही, चंद्रपूर संदर्भात वादाचे विषय असल्याने कार्यकर्ते नाराज आहेत असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

चंद्रपुरात विनायक बांगडे यांना हंसराज अहिर यांच्याविरोधात काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. बांगडे यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्ते नाराज आहेत. आता अशोक चव्हाण नाराज आहेत का? त्या क्लिपमध्ये त्यांचा आवाज आहे का? हे स्पष्ट व्हायचं आहे. तूर्तास तरी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे हे माझे काम असल्याचे चव्हाण यांनी म्हटलं आहे. मात्र जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यामुळे अशोक चव्हाण पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.