बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी अनेकांकडून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देत शिवसेनेच्या वक्तव्यावरून शंका उपस्थित होत असल्याचं म्हटलं. तसंच मुंबई पोलीस या प्रकरणाचा दबावाखाली तपास करत असून त्याची हत्याच झाल्याचं राणे म्हणाले.

“मी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं नाही. जेव्हा त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्यावेळी ते यावर का बोलत आहेत?,” असा सवालही त्यांनी केला. मुंबई पोलीस दबावाखाली तपास करत आहेत आणि सीबीआय तपासातून सर्व सत्य समोर येईल. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर अपेक्षा वाढल्याचे ते म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणावर वक्तव्य केलं.

यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतही सुशांतची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचे राणे म्हणाले होते. या प्रकरणात महाराष्ट्र सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. “१३ जून रोजी रात्री सुशांतच्या घरी पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीमध्ये महाराष्ट्रातील एक मंत्रीही उपस्थित होते. पार्टी संपल्यानंतर ते मंत्री त्याच्या घरातून निघून गेले आणि सकाळी सुशांतचा मृतदेह सापडला,” असं राणे म्हणाले होते.

सुशांतच्या घराच्यानजीक असलेल्या अभिनेता डिनो मोरियाच्या घरी रोज मंत्री येतात. ते रोज त्या ठिकाणी येऊन काय करतात? असा सवालही राणे यांनी केला होता. दरम्यान राणे यांनी ते मंत्री कोण याबाबत मात्र कोणतीही माहिती दिली नव्हती. परंतु पोलीस जेव्हा त्यांना अटक करण्यासाठी येतील तेव्हा सर्वाना याची माहिती मिळेल आणि आपण त्या मंत्र्याच्या फोटोसहित पुरावे घेऊन माध्यमांसमोर येणार असल्याचं ते म्हणाले होते.