काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाने एकत्र येऊन तयार केलेल्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याआधी, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सोबतीला अजित पवारांनीही उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणारं संख्याबळ नसल्यामुळे काही दिवसांमघध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येणार हे आता निश्चीत झालेलं आहे. मात्र राज्यातल्या या सत्ताबदलावर, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सूचक शेरो-शायरी केली आहे.

अमृता फडणवीसांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर, ‪पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर,‬ ‪खिज़ां की ज़द में हूँ मौसम ज़रा बदलने दे ! या ओळी टाकल्या आहेत. याचसोबत गेली ५ वर्ष महाराष्ट्राने आपल्याला वहिनी म्हणून जो आदर दिला त्याबद्दलही अमृता फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्षांनी आपली सहमती दर्शवली आहे. १ डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्कावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.