“निवडणुकीपूर्वी आम्ही फार कोणाला पक्षात घेतलं नाही. आमच्या पेक्षा जास्त लोक शिवसेनेनं घेतले. अनेक जण आधी आमच्याकडे आले होते. परंतु आम्ही त्यांना पक्षात घेण्यास नकार दिला आणि त्यानंतर ते शिवसेनेकडे गेले. आमचं जागा वाटप आणि कोणत्या जागेवर कोणाचा उमेदवार उभा करायचा हे ठरलं होतं. परंतु काही निवडून येणारे लोक त्यांच्याकडे गेले आणि त्यानंतर शिवसेनेनं त्या जागांवरही आपला हक्क दाखवण्यास सुरूवात केली. अखेर आम्हालाही पक्ष सुरू ठेवायचा आहे. म्हणून निवडणुकीपूर्वी आम्ही काही लोकांना पक्षात घेतलं,” असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. तसंच आमच्या नाकाखाली काय सुरू होतं हे आम्हाला उशीरा समजलं, असंही ते म्हणाले.


“आम्हालाही आमचा पक्ष सुरू ठेवायचा आहे म्हणून आम्ही काही लोकांना निवडणुकांपूर्वी आमच्याकडे घेतलं. निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी आमचे उमेदवार फार कमी मतांनी पडले. आमचा तो निर्णय चुकला किंवा बरोबर आहे पुढचा भाग आहे,” असं फडणवीस यावेळी म्हणाले. ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या ‘ लोकसत्ता’तर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सर्वांच्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. मतांनी पडले. आमचा लोकांना पक्षात घेण्याचा निर्णय चुकला किंवा बरोबर आहे पुढचा भाग आहे,” असं फडणवीस यावेळी म्हणाले.

नाकाखाली काय सुरू उशिरा समजलं

“अनेकदा आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांसाठी खुप काही केलं. उद्धव ठाकरे आम्हाला अनेकदा फोनही करायचे. निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचाराला आम्ही गेलो होतो. अनेक ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला. परंतु भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून कधीही कोणी आलं नाही. कालांतरानं आमच्या नाकाखाली काय सुरू होतं हे आम्हाला समजलं,” असं ते म्हणाले.

…तर संधीसाधू पक्ष म्हटलं असतं

लोकसभेच्या वेळी युतीचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणुकांच्या वेळी आम्ही विना युती बहुमतानं निवडून येऊ अशी खात्री होती. निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा झाली होती. परंतु लोकसभेला युती करायची आणि विधानसभेला केली नाही तर आपण संधीसाधू पक्ष असल्याचा समज होईल, असं मोदी म्हणाले होते. परंतु पक्षांची ताकद पाहून आपण कमी जास्त जागा घेऊ शकतो अस ठरल्याचं त्यांनी बोलतना सांगितलं.

शिवसेना-राष्ट्रवादीचं अंडरस्टँडिंग

“निवडणुकीच्या वेळी अखेरच्या क्षणी मोठी बंडखोरी झाली. भाजपाच्या अनेक बंडखोरांना आम्ही त्याचे अर्ज मागे घ्यायला लावले. पण शिवसेनेच्या बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतलेच नाहीत. उलट त्यांना मदतच होताना दिसली. तसंच अनेक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचं अंडरस्टॅंडिंग झाल्याचं दिसून आलं. काही ठिकाणी शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसनं मदत केली. तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसच्या उमेदवारांना शिवसेनेनं मदत केली. अनेक ठिकाणी थोड्या मतांनी आमच्या जागा गेल्या,” असंही ते म्हणाले. तसंच “निवडणुकीत आमच्या जागा नक्कीच कमी झाल्या. तरी आम्ही १०५ जागा जिंकलो. पण शिवसेनेला मोठा फटका बसला. ते जर सोबत असते तर त्यांच्या किमान ९० जागा तरी आल्या असत्या,” असंही त्यांनी नमूद केलं.