“दिल्ली हे राजधानी आहे आणि केंद्राचाही अंमल आहे. त्यांनी केंद्राची मदत घेतली. दिल्ली यापूर्वी करोनाच्या कमी चाचण्या करत होतं. त्या आता दररोज २८ हजार ते ३० हजारांवर गेल्या. त्यांनी आयसोलेशन सेंटर उभं केलं. महाराष्ट्रानंही ते केलं पण जागा रिकाम्या आहे. दिल्लीत आज अॅक्टिव्ह केस कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रात ते करणं शक्य आहे. आपल्याकडे चाचण्या कमी होत आहेत, असं मत विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. तसंच मुंबईत करोनाचं प्रमाण नियंत्रणात आलं असं म्हटलं तर मृत्यूदर हा अधिक का आहे? असा सवालही त्यांनी केला.

आणखी वाचा- उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत, खूप संभाळून पावले उचलतात – देवेंद्र फडणवीस

“मुंबईत करोनाचं प्रमाण नियंत्रणात आलं म्हटलं तर मृत्यूदर अधिक का? दिल्लीत तसं नाही. मुंबईकरांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होते हे खरं आहे. मुंबईत रुग्णांची संख्या कमी आहे याचं कारणं चाचण्या कमी होत आहे. रेट ऑफ इन्फेक्शन १७-२० टक्के आहे. पुण्यात सध्या करोनाबाधितांच्या चाचण्या वाढल्या आहेत. जर करोनाची दुसरी लाट आली नाही तर नक्कीच मुंबईत परिस्थिती नियंत्रणात येईल. त्यासाठी आपण चाचण्या वाढवायला हव्या. चाचण्यांनंतर करोनाबाधितांची संख्या वाढलेली दिसली तरी चालेल. तरी चाचण्या अधिक होण्यावरच भर दिला पाहिजे,” असं फडणवीस यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- अर्थव्यवस्थेला उभं करण्यासाठी आता धाडसी निर्णय घ्यावे लागतील – देवेंद्र फडणवीस

“पुणे मनपाला आतापर्यंत राज्य सरकारनं पैसा दिला नाही. आतापर्यंत २५० कोटी पालिकेने आपले खर्च केले. पुणे महापालिकेच्या महापौरांशीही माझी चर्चा झाली. अखेरच्या रुपयापर्यंत सर्वांना मदत झाली पाहिजे असंही मी त्यांना सांगितलं. मुंबईत पालिकेला या लढ्यात अनेकांकडून मदत मिळाली आहे. परंतु पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये पालिकांनीच सर्व काम करावं हे योग्य नाही. महापालिकांकडे आरोग्य नाही. प्राथमिक आरोग्याची जबाबदारी आहे. मुंबई महानगरपालिका जुनी असल्यामुळे त्यांच्याकडे पारंपारिक पद्धतीनं हे काम सुरू आहे. राज्य सरकारनं यावर लक्ष द्यायला हवं,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- “डब्ल्यूएचओ काही माझ्याकडून सल्ले घेत नाही”; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

ताकदीनं करोनाचा लढा नाही

“सरकार ज्याप्रकारे चाललंय त्याप्रकारे तो योग्य पुढाकार वाटत नाही. सरकार त्या ताकदीनं करोनाशी लढत नाही. आज आपण मुंबईत दिवसाला पाच साडेपाच हजार चाचण्या करतो. आपली १२ हजार चाचण्यांची क्षमता आहे. सरकारनं स्थापन केलेल्या समित्यांच्या सूचनांवर सरकार कोणतंही काम करत नाही. आज आपण समितीच्या शिफारसी स्वीकारली तर आपण पुढील दोन महिन्यामध्ये त्या आचरणात आणून पुढील पावलं उचलू शकू,” असंही फडणवीस म्हणाले.