पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बहुप्रतीक्षित राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. भूमिपूजनाच्या निमित्तानं देशभरात आज उत्साहाचं वातावरण होतं. तर दुसरीकडे भाजपाच्या अनेक नेत्यांनी आपल्या घरांमध्येही प्रभू श्रीरामाचं पूजन केलं. भूमिपूजनाच्या निमित्तानं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भजन गायल्याचं पाहायला मिळालं.

राम मंदिराच्या भूमिपूनजनाच्या निमित्तानं देशात उत्साहाचं वातावरण होतं. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपा कार्यालयात भजन गायलं. तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोल्हापूरमधील घरात गुढी उभारत हा सोहळा साजरा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. भूमिपूजन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. नरेंद्र मोदींनी यावेळी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार मानले. राम मंदिराच्या टपाल तिकीटाचंही मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. आज प्रभू रामाचा जयघोष संपूर्ण जगभरात होत आहे असं सांगत मोदींनी सर्व देशवासी आणि जगभरात असलेल्या भारतभक्त आणि रामभक्तांना शुभेच्छा दिल्या.

संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त

शरयू नदीच्या काठावर सुवर्ण इतिहास लिहिला गेला आहे असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. मंदिराच्या भूमिपूजनाचा आमंत्रण का स्वीकारलं हे सांगताना पंतप्रधान मोदींकडून रामकार्य केल्याशिवाय मला आराम मिळत नाही अशी भावना व्यक्त केली. “आज संपूर्ण भारत राममय झाला आहे. संपूर्ण देश रोमांचित आहे, प्रत्येकजण भावूक आहे. कित्येक दशकांची प्रतिक्षा आज संपत आहे. करोडो लोकांना आज आपण हा क्षण जिवंतपणी पाहू शकत आहोत यावर विश्वासच बसत नसेल,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं. संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाली असंही ते म्हणाले.