करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ४ मे पासून दोन आठवड्यांसाठी पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचं चक्र ठप्प झालं आहे. दरम्यान, राज्यालाही लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. “हळूहळू आपल्याला लॉकडाउनमधून बाहेर पडून अर्थव्यवस्था सुरू करणं आवश्यक आहे,” असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरूवार) करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर फडणवीस हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“लॉकडाउनबाबत त्या त्या वेळी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागेल. त्याबाबत आता काहीही सांगणं शक्य नाही. पण लॉकडाउनमधून बाहेर पडून अर्थव्यवस्था सुरू करणं आवश्यक आहे,” असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. यावेळी बोलताना त्यांनी अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रणामात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप केला. तसंच “राज्य सरकारनं यात लक्ष घालून अधिकाऱ्यांमधील समन्वय वाढवला पाहिजे. सध्या सरकारनं शैक्षणिक शुल्क किंवा कर वाढवण्याचा कोणताही विचार करू नये,” असंही ते म्हणाले.

“कंन्टेंन्मेट झोनच्या ज्या गाइडलाइन्स आहेत त्या सर्वांनी कटाक्षानं पाळल्या पाहिजेत. सरकारनं करोनाग्रस्तांची संख्या लपवण्यासारखे प्रकार करू नये. जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं जावं,” असं फडणवीस म्हणाले. “केंद्र सरकारनं राज्याला आवश्यक ती मदत केली आहे. काल केंद्र सरकारकडून माहिती घेण्यात आली. महाराष्ट्राला आतापर्यंत सर्वात जास्त मदत करण्यात आली आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.