“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लपवण्यात आले. रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई (ता. मुरूड) येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?,” असा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुबांवर केला होता. त्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“एखाद्या नेत्याने आणि त्याच्या कुटुंबाने कशाला प्राधान्य द्यायला हवं? विश्वार्हतेला की नफेखोरीला? सत्तेसाठी पैशाचा वापर करणाऱ्यांचा आपण फैसला करायला हवा,” असं मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं. किरीट सोमय्या यांच्या ट्वीटला रिट्वीट करत त्यांनी याप्रकरणी निशाणा साधला.
What should a leader & his family hold – an office of trust or office of profit ? It’s high time we decide the destiny of those trading money for power ! https://t.co/1b2gxkRVul
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 11, 2020
काय म्हणाले होते सोमय्या?
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लवण्यात आले,” असा सवाल सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांनी जमीन व्यवहाराची कागदपत्रेही ट्वीट केली होती. “ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार. गाव- कोलेई, तालुका- मुरुड, जिल्हा- रायगड. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक-रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे या ठिकाणी दिसत आहेत,” असं सोमय्या यांनी म्हटलं होतं.
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 12:46 pm